|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दुष्काळग्रस्तांसाठी ओला चारा

दुष्काळग्रस्तांसाठी ओला चारा 

वार्ताहर/ आनेवाडी

समाजासाठी अनेक लोक काम करताना दिसतात. मात्र, आपल्या कामाने खऱया अर्थाने समाजाला उपयोग व्हावा, या दृष्टीने जावली तालुक्याचे माजी सभापती सुहासदादा गिरी व विद्यमान सभापती जयश्रीताई गिरी यांनी बीड येथील दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी दोन ट्रक ओला चारा पाठवून देवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दुष्काळग्रस्त भागात जेथे दुष्काळाने होरपळलेल्या मुक्या प्राण्यांना चारा मिळणे अवघड असते, अशा ठिकाणी त्यांनी आपल्याच शेतातील व इतर ठिकाणाहून ओला चारा उपलब्ध करून बीड येथील दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. दानधर्म आपण करतोच; पण मुक्या प्राण्यांसाठी करत असलेल्या या अनोख्या उपक्रमाने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या उपक्रमास शेतकऱयांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

दुष्काळी भागातील या मुक्या जनावरांसाठी आपल्याही शेतातील ओला चारा त्यांच्याकडे जमा करून या पती-पत्नीच्या कामामध्ये तालुक्यातील बेलावडे गावचे सरपंच अजित शिंदे, धैर्यशील निकम, सयाजी कदम, संजय शेलाटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते हातभार लावत आहेत. त्यांच्या या उल्लेखनिय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.