|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » सलग दुसऱयांदा विदर्भाची इराणी चषकाला गवसणी

सलग दुसऱयांदा विदर्भाची इराणी चषकाला गवसणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सलग दुसऱया वषी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकण्याचा मान विदर्भाच्या संघाने पटकावला आहे. शेष भारत संघाने विदर्भापुढे विजयासाठी 280 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत विदर्भाच्या संघाने शेष भारत संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात केली. 269/5 अशी अवस्था असताना विदर्भाच्या संघाने आपला दुसरा डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला.

 

विदर्भाने या सामन्यात पहिल्या डावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे शेष भारतीय संघापुढे विजय मिळवण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे शेष भारताच्या संघाने 3 बाद 374 या धावसंख्येवर आपला दुसरा घोषित केला आणि विदर्भापुढे विजयासाठी 280 धावांचे आव्हान ठेवले होते. शेष भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विदर्भाला फैझ फझल या सलामीवीराला गमवावे लागले. त्यावेळी विदर्भाच्या खात्यात एकही धाव नव्हती. त्यानंतर संजय रामास्वामी आणि अथर्व तायडे यांनी दुसऱया विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या भागीदारीने विदर्भाच्या विजयाचा पाया रचला गेला. राहुल चहारने रामास्वामीला बाद करत ही जोडी फोडली. रामास्वामी बाद झाल्यावर अथर्वही जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि चहारनेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अथर्वने यावेळी आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली.