|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » गोगटे फौंडेशनची पुणे रेल्वेस्थानकावर ट्रॉली, व्हीलचेअरची सेवा

गोगटे फौंडेशनची पुणे रेल्वेस्थानकावर ट्रॉली, व्हीलचेअरची सेवा 

 पुणे / प्रतिनिधी :

– बेळगावच्या अरविंद गोगटे यांच्या जन्मदिनी समाजोपयोगी सुविधेचा श्रीगणेशा

बेळगावच्या गोगटे फौंडेशनकडून पुणे रेल्वेस्थानकावर प्रवासी, हमाल बांधवांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी व्हीलचेअर व ट्रॉलीची सेवा रूजू करण्यात आली आहे. एका प्लॅटफॉर्महून दुसरीकडे जाताना ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. तर हमाल बांधवांनाही वजनदार सामान डोक्यावरून वहावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुविधेकरिताच जन्मदिनादिवशी पेढे, केक कापण्याऐवजी हा उपक्रम राबविण्याचा  निर्णय घेतल्याची माहिती गोगटे फौंडेशनचे अध्यक्ष अरविंद गोगटे यांनी शनिवारी दिली.

बेळगावच्या गोगटे फौंडेशनच्या सौजन्याने पुणे रेल्वे स्थानकावर अरविंद गोगटे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीलचेअर आणि ट्रॉलीचे वितरण करण्यात आले. हमाल बांधव व अरविंद गोगटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. डीआरएम डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर मिलिंद देऊसकर, सिनियर डिव्हीजनल कमिशनर मॅनेजर कृष्णात पाटील, स्टेशन डायरेक्टर ए. के. पाठक उपस्थित होते. या वेळी पाठक यांनी गोगटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यासंदर्भात बोलताना गोगटे म्हणाले, माझा जन्म पुण्यात झाला. त्यामुळे पुणे ते बेळगाव स्थानक असा प्रवास मी गेली 70 ते 75 वर्षे केला आहे. लहानपणी आईचे बोट धरून येथे बाहेरील बाजूला असलेल्या पांढऱया घोडय़ाच्या बग्गीत बसून यायचो. आज त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. एखाद्या प्रवाश्यास व्हीलचेअरची सुविधा स्टेशनवर हवी असल्यास त्यांनी रेल्वे आरक्षण करताना किंवा तिकीट घेताना पूर्वकल्पना दिली, तरीदेखील ही सुविधा त्वरित उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

एकूण 12 व्हीलचेअर व ट्रॉली रेल्वे मॅनेजर व हमालांकडे सुपूर्द करण्यात आल्या. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केतन गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वे स्टेशनचे वाणिज्य निरीक्षक संजीव सोनल यांनी केले. तर ए. के पाठक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने हमाल बांधव, रेल्वे कर्मचारी व गोगटे कुटुंबीय उपस्थित होते.