|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफच्या बसवर झाली होती दगडफेक

पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफच्या बसवर झाली होती दगडफेक 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सापडण्यास सुरुवात झाली आहे. एक वृत्तवाहनीच्या प्रतिनिधीने हल्ल्याप्रसंतगी घटनास्थळावर असलेल्या जवानांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती सापडली आहे. पुलवामा हल्ला प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

     एका जवानाने सांगितले की, स्फोटाच्या पूर्वी वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या बसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. त्याच्या 10 मिनिटांनंतरच स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या बसला धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. तर दुसऱया एका जवानाने सांगितलं की, त्या स्फोटाचा आवाज अजूनही आमच्या डोक्यातून जात नाही आहे. आम्ही सकाळी एकत्र निघालो होतो. जेवणही एकत्रच झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही हल्ला झाला त्या ठिकाणी आलो आणि अचानक ती कार बसवर आदळली आणि स्फोटकांचा स्फोट झाला. त्यानंतर अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली होती, तर इतर जखमी जवानांना आम्ही तात्काळ रुग्णालयात हलवले. आता आम्ही निष्ठेने कर्तव्य बजावणार असून, दहशतवाद्यांचा योग्य बदला घेऊ, असंही या जवानांनी सांगितलं आहे. हल्ला झाला त्यावेळी बसचा वेग कमी होता. ज्या बसला लक्ष्य करण्यात आले ती बुलेट प्रूफ नव्हती. एनआयएची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, हल्ल्याचा तपास सुरू आहे.