|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापासून रोखले

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापासून रोखले 

काळसे येथे महिलेच्या मृतदेहाची परवड : अखेर घरामागेच अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / मालवण:

 काळसे चर्मकारवाडीतील रहिवासी श्रीमती सत्यवती काळसेकर यांच्या मृतदेहावर गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यास काही ग्रामस्थांनी रोखल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अजिंक्य पाताडे यांनी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. त्यामुळे मृतदेह स्माशनभूमीपर्यंत नेऊन पुन्हा माघारी घरी आणण्याची वेळ संबंधितांवर आली. अखेर काळसेकर कुटुंबियांनी आपल्या घरामागेच वृद्धेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे पुरोगामी समजल्या जाणाऱया महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी पाताडे यांनी केली.

दरम्यान, पाताडे यांनी केलेल्या मागणीनुसार तातडीने काळसे ग्रामपंचायत आणि संबंधित कुटुंबियांकडे चौकशी करण्यात येऊन तात्काळ सुनावणी घेण्यात येईल, असे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट केले.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, राजू परुळेकर, सुनील घाडीगावकर, निधी मुगणेकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, सागरिका लाड तसेच अधिकारी उपस्थित होते.

स्मशानभूमीचा विषय तात्काळ सोडवा

काळसे येथे चर्मकार समाजाची सात घरे आहेत. या वाडीसाठी एका खासगी जागेत स्मशानभूमी होती. मात्र संबंधित जमीन मालकाने सदरची जागा ताब्यात घेत स्मशानभूमी बंद केली. सदरची जागा खासगी असल्याने चर्मकार वाडीतील ग्रामस्थांनी त्यावर आक्षेप नोंदविला नाही. मात्र गावाच्या सार्वजनिक स्मशानभूमीत चर्मकार समाजातील व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आल्याने वाडीतील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चर्मकार समाजावर झालेल्या अन्यायाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी पाताडे यांनी केली.

विरोध करणे चुकीचे – बीडिओ

सार्वजनिक स्मशानभूमीत कोणत्याही समाजाला अंत्यसंस्कार करण्यापासून रोखणे चुकीचे आहे. त्यामुळे तात्काळ ग्रामपंचायतीला नोटीस काढून याबाबत चौकशीसाठी सुनावणी घेण्यात येईल. मागासवर्गीय समाजाला सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या घटनेची चौकशी करण्यात येऊन सत्य समोर आणण्यात येईल, असेही गटविकास अधिकाऱयांनी स्पष्ट केले.