|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानी गायकांविरोधात मनसे आक्रमक ; यूटय़ुबवरून टी सीरिजने गाणे हटवले

पाकिस्तानी गायकांविरोधात मनसे आक्रमक ; यूटय़ुबवरून टी सीरिजने गाणे हटवले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मोदी सरकारने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे. यानंतर आता पाकिस्तानी कलाकारांना मनसेने दणका दिला आहे. पाकिस्तानी गायकांची गाणी त्वरित यूट्युबवरुन हटवा, असा इशारा मनसेने म्युझिक कंपन्यांना दिला आहे. यानंतर टी सीरिजने पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली.

पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवा, असा सज्जड दम मनसेने दिला होता. याशिवाय पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे बंद करा, असा इशारादेखील दिला. ‘आम्ही टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टिप्स म्युझिक यासारख्या कंपन्यांना पाकिस्तानी गायकांसोबत काम करु नका, असे सांगितले आहे. त्यामुळे या कंपन्यांनी त्वरित पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे थांबवावे. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू,’ असा धमकीचा इशारा मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला. आम्ही दिलेल्या इशाऱयानंतर टी सीरिजने त्यांच्या यूट्युब चॅनेलवरुन पाकिस्तानी गायकांची गाणी हटवल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच भूषण कुमार यांच्या टी सीरिजने वेगवेगळय़ा गाण्यांसाठी राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांच्यासोबत करार केले होते. मात्र मनसेच्या इशाऱयानंतर टी-सीरिजने लगेच पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली. याआधी 2016 साली उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळीही मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती.