|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इतरांप्रमाणे माझ्या मनातही आग धुमसतेय!

इतरांप्रमाणे माझ्या मनातही आग धुमसतेय! 

बरौनी / वृत्तसंस्था :

पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय संतप्त झाला आहे. भारतीयांच्या मनातील संताप ओळखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या बरौनी जिल्हय़ातील सभेत देशवासीयांच्या मनात भडकलेली आग, माझ्या मनातही धुमसत असल्याचे उद्गार काढले आहेत. पंतप्रधान मोदींनी सभेच्या व्यासपीठावरून पुलवामा हल्ल्यात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान मोदी रविवारी 33 हजार कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांच्या शुभारंभासाठी बिहारमध्ये पोहोचले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवानांना हौतात्म्य आले होते. यात बिहारच्या दोन जवानांचा समावेश होता.

देशवासीयांच्या मन कशाप्रकारे खदखदतेय याचा मी अनुभव करत आहे. जी आग तुमच्या मनात आहे, तीच माझ्या मनात धुसमत आहे, ही आग विझू नये,   असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे. पंतप्रधानांनी रविवारी 13365 कोटी रुपयांच्या खर्चाने निर्माण होणाऱया पाटणा येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभ केला. याचबरोबर त्यांनी सुमारे 12 प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी उपस्थित होते.

विकासाच्या दिशेने मार्गक्रमण

बिहार आणि पूर्व भारतात अन्य क्षेत्रांप्रमाणेच विकासाच्या दिशेने अगेसर होण्याची शक्ती आहे. केंद्र सरकार याकरता सातत्याने पुढाकार घेत आहे. पूर्व भारताचा कायापालट होण्याचा दिवस आता दूर नाही. बिहारच्या 27 शहरांना आधुनिक सुविधांशी जोडले जात आहे. मेट्रोमुळे पाटणा शहराचा वेगाने विकास होणार आहे. रेल्वेसोबतच शहरात स्मार्ट वाहतूक व्यवस्थेची योजना आखली जात असल्याचे मोदी म्हणाले.

सवर्णांना दिले आरक्षण

राज्यात 18 लाख घरांची बांधणी झाली असून छपरा आणि पूर्णियामध्ये नवे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जात आहे. गरीबांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आमच्या सरकारने सवर्णांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण अन्य वर्गांना प्रभावित करणार नसल्याचे विधान पंतप्रधानांनी केले आहे.

हल्ल्याचा सूड घेतला जाणार

पुलवामामधील दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा देश सूड घेईल. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना देश माफ करणार नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. या हल्ल्यात बिहारचे दोन जवान हुतात्मा झाले असून एक जवान जखमी आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आम्ही कोणताही त्रास होऊ देणार नसल्याचे उद्गार मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काढले आहेत.

मोदी पुन्हा होणार पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जलदगतीने विकास होतोय. आम्हाला नरेंद्र मोदींबद्दल अभिमान आहे. मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा दावा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केला आहे.

भारत माता की जयच्या घोषणा

बरौलीमध्ये पंतप्रधानांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमात ‘नमो अगेन’ असा संदेश असलेली टीशर्ट परिधान केलेल्या युवकांचे प्रमाण अधिक होते. कार्यक्रमाचा परिसर ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दणाणून गेला.