|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगड किल्ला-पवनचक्कीपर्यंत लवकरच ‘झिपलाईन’

देवगड किल्ला-पवनचक्कीपर्यंत लवकरच ‘झिपलाईन’ 

दीपक केसरकरांची माहिती :  स्वदेश भ्रमण योजनेतून निधी मंजूरः देवगडात वैश्यवाणी समाजाचे स्नेहसंमेलन

वार्ताहर / देवगड:

शासनाच्या ‘स्वदेश भ्रमण’ योजनेतून देवगड किल्ला ते पवनचक्की अशा ‘झिपलाईन’ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या चार महिन्यात या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. तसेच गणपतीपुळे तीर्थक्षेत्राप्रमाणे श्रीक्षेत्र कुणकेश्वरचा विकास करण्यासाठी दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यालाही लवकरच मंजुरी प्राप्त होईल. तरुणांनी एकत्रित येऊन पर्यटन व्यवसायात काम करण्यासाठी विविध योजना तयार करण्यात आल्याची माहिती गृह, वित्त राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन व वधु-वर मेळावा रविवारी येथील इंद्रप्रस्थ सभागृहात झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उद्घाटन मुंबईचे उद्योजक विवेक माणगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, कोकण सिंचन महामंडळाचे माजी अध्यक्ष संदेश पारकर, सभापती जयश्री आडिवरेकर, स्नेहा माणगावकर, समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष बिपीन कोरगावकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, ऍड. अविनाश माणगावकर, शशिकांत नेवगी, जि. प. सदस्य बाळा जठार, प्रदीप नारकर, नागेश मोर्ये आदी उपस्थित होते.

वॉटर स्पोर्टस्साठी 25 टक्के अनुदान

पालकमंत्री केसरकर म्हणाले, देवगडमधील रस्त्यांसाठी चार कोटीचा निधी मंजूर केला आहे. ऍडव्हेंचर स्पोर्टस्च्या माध्यमातून देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर व किनारी भागातील गावांमध्ये विविध उपक्रम सुरू केले जाणार आहेत. पर्यटन व्यवसायातून चांगली संधी युवकांना प्राप्त होणार आहे. तरुणांनी एकत्रित येऊन वॉटरस्पोर्टस् सुरू केल्यास 25 टक्के अनुदान दिले जाईल. समुद्र किनारी भागात निवास न्याहारी योजनेसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यात महिलावर्गाने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

एक्स-रे मशिनद्वारे समजणार हापूसचा ‘साका’

खाडीकिनारी व खाडय़ांमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी केल्यास 90 टक्के अनुदान देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हापूसमधील साका ओळखण्यासाठी आता एक्स-रे मशिनची उपलब्धता देवगड व नेरुर येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे हापूसची प्रत राखता येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा!

उद्योजक माणगावकर म्हणाले, येत्या पाच वर्षात व्यवसायातील बदल समाजातील व्यावसायिकांनी लक्षात घेऊन एकत्रित व्यवसायाकडे वळावे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय उभारणी करावी. व्यवसायातील कर्मचारी हा आपला बिझनेस पार्टनर झाला पाहिजे. वेगवेगळय़ा व्यवसायाचे शिक्षण मुलांना द्यावे.

बिझनेस क्लबमधून प्रगती साधा-जठार

जठार म्हणाले, वैश्य बिझनेस क्लबमध्ये समाज बांधवांनी सहभाग घेऊन व्यवसायात प्रगती साधावी. सर्व व्यावसायिकांना एका छताखाली आणण्याचे काम क्लबच्या माध्यमातून केले जाणार आहे. पारकर म्हणाले, वैश्य समाजाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली असून इतर समाजांनीही पाठिंबा दिला आहे. समाजाने संघटन अजून मजबूत करावे.

समाजाला आरक्षणाचा तोटा

ग्रामीण भागातील बांधवांची प्रगती साधण्यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत, असे नलावडे यांनी सांगितले. तर भोगटे म्हणाले, भविष्यात आरक्षणाचा तोटा समाजाला होणार आहे. जिल्हय़ात आरक्षित महासंघाची स्थापना सर्वच समाजांना एकत्रित करून करण्यात आली आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षणामध्ये आपल्याला केवळ 17 ते 19 टक्के आरक्षण मिळते. आरक्षण मिळण्यासाठी इतर समाजांचा पाठिंबा आहे, असे सांगितले. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष तेली, सभापती आडिवरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाच्या स्मरणिकेचे प्रकाशन, गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कोरगावकर यांनी केले. आभार ऍड. माणगावकर यांनी मानले. दरम्यान, दुपारच्या सत्रात वधु-वर मेळावा झाला.

आज बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन

 दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच पाकिस्तानच्या कृतीचा निषेध करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सावंतवाडी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी जिल्हय़ातील सर्वच बाजारपेठेतील व्यवसाय व्यापाऱयांनी बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले.