|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विष्णू वाघ यांना अखेरचा निरोप

विष्णू वाघ यांना अखेरचा निरोप 

प्रतिनिधी /फोंडा :

गोव्याच्या कानाकोपऱयातील असंख्य चाहते, महाराष्ट्र व इतर प्रांतातून आलेले साहित्यिक मित्र, राजकीय नेते तसेच कला व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अलोट गर्दीत ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी उपसभापती विष्णू सुर्या वाघ यांना अखेरचा निरोप देण्यात आला. डोंगरी हे त्यांचे मूळ गाव असले तरी या सरस्वतीच्या उपासकाने राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या फोंडय़ात अखेरचा विसावा घेतला.  काशिमठ बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन व त्यानंतर फोंडा येथील मुक्तीधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गेल्या दोन वर्षांपासून आजारी असलेल्या विष्णू वाघ यांचे 8 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत निधन झाले होते. काल रविवारी पहाटे त्यांचा मृतदेह ढवळी-फोंडा येथील निवासस्थानी पोचला व त्यानंतर सकाळी 9 वा. पासून बांदोडा मैदानावरील सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. अंत्यदर्शनासाठी गोव्याच्या कानाकोपऱयातील असंख्य चाहते व मित्रपरिवाराने गर्दी केली होती. महाराष्ट्र व इतर प्रातांतूनही साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे व इतर चाहत्यांचा समावेश होता. पोलीस पथकातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विष्णू वाघ यांचे कलाकार मित्र व चाहत्यांनी भगवे झेंडे दाखवून व ‘जय रामकृष्ण हरी’ अशा टाळ मृदंगाच्या गजरात फुलांनी सजवलेल्या वाहनातून बांदोडा ते फोंडा दरम्यान अंत्ययात्रा काढली. कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या देखरेखीखाली अंत्ययात्रेचे चोख नियोजन करण्यात आले होते.

कर्तृत्त्वाचा सन्मान मरणोत्तर पद्मश्रीने करावा

साहित्य, कला, संस्कृती, राजकारण अशा बहुतेक क्षेत्रात विष्णू वाघ यांनी गोव्यासह, महाराष्ट्रातही आपल्या कतृत्त्वाचा ठसा उमटविला होता. जीवनाच्या या प्रवासात त्यांनी असंख्य मित्र जोडले. सांतआंद्रे मतदारसंघातून सन 2012 साली आमदार म्हणून निवडून आलेले वाघ हे ख्रिस्ती व इतर धर्मियांमध्येही तेवढेच लोकप्रिय होते. ख्रिस्ती व मुस्लीम धर्मांतील मित्र व हितचिंतकांच्या उपस्थितीवरुन हे जाणवत होते. सर्वच धर्मियांशी त्यांचे सलोख्याचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभावी यासाठी सर्वधर्मिय प्रार्थनाही करण्यात आली. त्यांच्या निकटवर्तीयांबरोबरच मित्रपरिवातील अनेकांना अश्रू आवरले नाहीत. विष्णू वाघ हे उच्च प्रतिभेचे कलावंत व दिलदार व्यक्ती होते. गोव्यासह मराठी साहित्य क्षेत्राला त्यांची नेहमीच उणिव भासणार आहे. कला व इतर क्षेत्रातील योगदानाबद्दल विष्णू वाघ यांना मरणोत्तर पद्मश्री बहाल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मोठा मुलगा प्रियदर्शन याने त्यांच्या चितेला अग्नी दिला.

Related posts: