|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंजाब विधानसभेत गदारोळ

पंजाब विधानसभेत गदारोळ 

चंदीगढ  / वृत्तसंस्था :

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेतल्याने पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आहेत. त्यांना सर्वच स्तरांतून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.  सिद्धू यांच्या विरोधात पंजाबच्या विधानसभेत जोरदार घोषणाबाजी झाली आहे.  सिद्धू यांनी केलेल्या विधानांबद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी केली आहे. विधानसभेत अकाली दलाच्या आमदारांच्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापले आणि आमदार परस्परांच्या विरोधात उभे ठाकले.

काही लोकांच्या कृत्यामुळे पूर्ण देशाला चुकीचे का ठरवत आहात असे प्रश्नार्थक विधान सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्यानंतर केले होते. त्यांच्या याच विधानावरून पंजाब विधानसभेत सोमवारी आरोप-प्रत्यारोप झाले. सिद्धू यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत अकाली दलाच्या आमदारांनी त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी असे म्हटले आहे.

अकाली आमदार आणि सिद्धू यावेळी समोरासमोर देखील ठाकले. आरोप-प्रत्यारोप केल्यावर अकाली नेते आणि सिद्धू परस्परांच्या दिशेने हातवारे करत ओरडत राहिले. देश दुःखी असताना सिद्धू दहशतवादाचे समर्थन करत आहेत. सिद्धू यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी असलेल्या जवळीकीचा लाभ मिळत असल्याचा आरोप अकाली नेते विरसा सिंग वलटोहा यांनी केला.

सिद्धूंना जोरदार विरोध

सिद्धू यांच्या विरोधात पंजाब विधानसभेत अकाली दलाने जोरदार निदर्शने केली. विधानसभेत अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजीठिया आणि सिद्धू यांच्यात जोरदार ‘तू-तू मै-मै’ देखील झाली. सिद्धू हे गद्दार असल्याचे मजीठियांनी म्हटले तर सिद्धू यांनी मजीठिया यांना ‘डाकू’ संबोधिले. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या विरोधात अपशब्दांचा वापर केला.

आमदारांचा सभात्याग

गोंधळामुळे पंजाब विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषण रोखण्यात आले. सिद्धू यांच्या विरोधात अकाली दल आणि भाजप आमदारांनी सभात्याग केला. सिद्धू आणि पाक सैन्यप्रमुख बाजवा यांच्या गळाभेटीचे चित्र, तसेच खलिस्तान समर्थक गोपाळ चावलासोबतच्या सिद्धूंच्या चित्रांना मजीठिया यांनी आगीच्या हवाली केले. यादरम्यान पाकिस्तानचा ध्वज देखील पेटवून देण्यात आला.