|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्री समादेवी पालखी सोहळा उत्साहात

श्री समादेवी पालखी सोहळा उत्साहात 

बेळगाव / प्रतिनिधी :

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळय़ानिमित्त सोमवारी श्री समादेवी पालखी सोहळा उत्साहात पार पडला. श्रींच्या पालखी प्रदक्षिणेला सायंकाळी मंदिरापासून सुरुवात झाली. तेथून समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्लीमार्गे श्री समादेवी मंदिरात पोहोचली.

प्रारंभी वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष बापुसाहेब अनगोळकर, सचिव मधुसूदन किनारी, ट्रस्टी सुभाष अंगडी, काशिनाथ कुदळे, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती केसरकर, सचिव शुभांगी देवलापूरकर यांच्या उपस्थितीत विधीपूर्वक पूजन आणि आरती करून श्री समादेवीची मूर्ती पालखीत बसविण्यात आली. श्री समादेवी मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी सोहळय़ाची सुरुवात करण्यात आली. पालखी मार्गावर दारोदारी भाविकांनी पालखी सोहळय़ाचे स्वागत करून देवीचे दर्शन घेतले. पालखी मार्गावर भक्तांच्यावतीने स्वागत करण्यात आले. समाज बांधवांच्यावतीने फटाक्मयांची आतषबाजी आणि देवीचा जयजयकार करण्यात येत होता. बँड पथकावर भक्तिगीते आणि देशभक्ती गीते सादर करण्यात येत होती.

सदर पालखी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर समाजाच्या महिला वर्गाकडून पालखीची ओवाळणी करण्यात आली. यानंतर पुन्हा पालखीने मंदिर प्रवेश केला. रात्री झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे खासदार सुरेश अंगडी, मंगला सुरेश अंगडी, अध्यक्ष बापुसाहेब अनगोळकर, सचिव मधुसूदन किनारी, ट्रस्टी सुभाष अंगडी, काशिनाथ कुदळे, महिला मंडळ अध्यक्षा भारती केसरकर, सचिव शुभांगी देवलापूरकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन देवलापूरकर यांनी तर सचिव शुभांगी देवलापूरकर यांनी आभार मानले.

आज महाप्रसाद

सालाबदप्रमाणे वैश्यवाणी समाज आणि श्री समादेवी संस्थेतर्फे भाविकांसाठी मंगळवार दि. 19 रोजी दुपारी 12 पासून श्री समादेवी देवस्थानच्या मंगल कार्यालयात महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. तरी सर्व जाती धर्माच्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैश्यवाणी समाज व श्री समादेवी संस्थानचे अध्यक्ष बापुसाहेब अनगोळकर व सचिव मधुसूदन किनारी यांनी केले आहे.