|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण घोटाळय़ाचा आरोप पर्रीकरांचा राजकीय स्टंट

खाण घोटाळय़ाचा आरोप पर्रीकरांचा राजकीय स्टंट 

प्रतिनिधी /पणजी :

शहा आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेऊन गोव्यातील खाण उद्योगातील रु. 35 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी असताना केला होता. मात्र हे सर्व राजकीय स्टंट असल्याचे आता सिद्ध झाले असून त्यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आणण्यात येईल, असे काँग्रेस प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी सांगितले. भाजप हा फसवणूक करणारा पक्ष असून पर्रीकर सरकारचा भ्रष्टाचार व इतर करनामे जनतेसमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाल्याचे त्यांनी नमूद केले. अनेकजण कॉंग्रेस प्रवेशासाठी इच्छूक असून ते लवकरच दाखल होतील, असे संकेत त्यांनी दिले.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, गोवा विधानसभेच्या सार्वजनिक लेखा समितीने शहा आयोगाचा हवाला देऊन खाण उद्योगात रु. 35 हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष हा केवळ राजकीय स्टंट होता. सत्ता मिळवण्यासाठीचे ते एक हत्यार होते, परंतु आता त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. भाजपचे नेते तो स्टंट होता अशी कबुली देत असल्याने भाजपने व प्रामुख्याने पर्रीकर यांनी जनतेला फसवल्याचे स्पष्ट होते. त्यांनी विधानसभेची व जनतेची या प्रकरणात पूर्णपणे दिशाभूल केल्याचे डॉ. चेल्लाकुमार यांनी सांगितले.

आताही काँग्रेस पक्ष नंबर वनच…

काँग्रेस हा गोव्यात सर्वाधिक विधानसभा जागा जिंकणारा नंबर वनचा पक्ष असून तो प्रथमपासून आणि आताही नंबर वन वरच आहे. भाजपचे मंत्री नीलेश काब्राल यांनी एकंदरीत वस्तुस्थिती बोलण्याचे धाडस दाखवले म्हणून ते कौतुकास पात्र आहेत. परंतु इतरांना मात्र त्याचे काहीच पडलेले नाही. शहा कमिशन हे कर्नाटक व ओडिशातील खाणी प्रकरणी नेमण्यात आले होते, असा दावा डॉ. चेल्लाकुमार यानी केला. त्याचा संबंध गोव्यातील खाणींसाठी कसा काय लावण्यात आला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.