|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणप्रश्नी राज्य सरकारच निर्णय घेईल

खाणप्रश्नी राज्य सरकारच निर्णय घेईल 

विशेष प्रतिनिधी /पणजी :

खाणींच्या प्रश्नी केंद्र नव्हे तर गोवा सरकारच निर्णय घेईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. क्रीडा खात्यात व गोवा क्रीडा प्राधिकरणातील मिळून 283 हंगामी कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच गोवा विधानसभा विसर्जित होणार नसल्याचे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या दोनापावला निवासस्थानी सोमवारी सायंकाळी झाली. बैठकीनंतर काही मंत्र्यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. खाणप्रश्नी आता केंद्र सरकार त्यावर तोडगा काढणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. विजय सरदेसाई यांनीच हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यावर तोडगा आता आम्हालाच काढवा लागेल. त्यामुळे खाण प्रश्नावर केंद्र सरकार तोडगा काढणार नाही व केंद्राने हात वर केले हे स्पष्ट झाले आहे.

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, गोवा विधानसभा विसर्जित होणार नाही. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर भाजपचे संख्याबळ 14 वरून 13 पर्यंत खाली आहे आहे आणि विरोधी पक्ष काँग्रेसचे संख्याबळ 14 राहिले आहे, मात्र त्याचा सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होणार नाही. विधानसभा विसर्जित होणार नाही. मुख्यमंत्र्यांनीही बैठकीत सरकार मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

क्रीडा व युवा व्यवहार खात्यातल्या 283 हंगामी कर्मचाऱयांना न्याय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका महत्त्वाच्या मुद्दय़ावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार गेली कित्येक वर्षे क्रीडा व युवा व्यवहार खात्यात हंगामी सेवा बजावणाऱया 193 कर्मचाऱयांना तसेच गोवा क्रीडा विकास प्राधिकरणात सेवा बजावणाऱया 91 हंगामी कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले. हा निर्णय केवळ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आशीर्वादामुळेच घेण्यात आला. आपण कित्येक वर्षे या कर्मचाऱयांना न्याय मिळावा म्हणून झटत होतो. एकाही मुख्यमंत्र्याला ते शक्य झाले नाही. केवळ पर्रीकरच करू शकले. बहुजन समाजाला त्यामुळे पर्रीकरांनी न्याय दिल्याचे बाबू आजगावकर यांनी म्हटले आहे. आपण जेव्हा पर्रीकरांच्या मंत्रिमंडळात आलो त्यावेळी पर्रीकरांनी आपल्याला आश्वासन दिले होते. केवळ 2 वर्षात या आश्वासनाची पूर्तता झाली, असेही ते म्हणाले.