|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात 

वार्ताहर /भुईंज :

रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कला व सांस्कृतिक विभागामार्फत शनिवारी पारंपरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या पारंपरिक दिनात विद्यार्थिनींनी मोठा सहभाग घेतला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पारंपरिक दिन साजरा करण्यात आला. 

    प्रारंभी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा. गणेश तारू, प्रा. राजेंद्र देशमुख यांनी पारंपरिक दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. संस्कृती व इतिहासातील चांगल्या परंपरा आपण पुढे नेल्या पाहिजेत आणि जतनही केल्या पाहिजेत, असे मत प्रा. गणेश तारू यांनी व्यक्त केले. तर प्रा. देशमुख म्हणाले, विविध संस्कृतीचा परिचय आपण करून घेतला पाहिजे, असे सांगितले.

    प्रास्ताविकात कला सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुभाष वाघमारे म्हणाले,  हजारो वर्षापासून चालत आलेल्या लोक-परंपरा काय आहेत याचा बारकाईने शोध घेतला पाहिजे. भारत हा विविध संस्कृती व तत्वज्ञानांनी नटलेला जगातील कदाचित; एकमेव देश आहे. जात आणि धर्मांचे अभिनिवेश न बाळगता आपण संस्कृती दर्शन घडवित राहिले पाहिजे आणि परंपराची चौकशी केली पाहिजे. परंपरेत संस्कृतीच्या प्रत्येक विधीत भावना असतात. भक्ती, मुक्ती, शांती, आनंद, वैराग्य, समता, दया, करूणा, विवेक या बरोबरच उपदेश आणि संदेशही असतात. संस्कृती समजून घेताना मानवी विविध भावनांची समज माणसाला होते. परंपरेत, संस्कृती, कला, नाटय़, इतिहास, तत्वज्ञान यांचा सुंदर समन्वय असतो. आपण डोळसपणे निरीक्षण करून चांगल्या परंपराचे जतन केले पाहिजे, असे सांगितले.

Related posts: