|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकला पुरावे देणार नाही!

पाकला पुरावे देणार नाही! 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

पुलवामा हल्ल्याप्रकरणी भारताकडून पाकिस्तानाला कोणतेही पुरावे सोपविले जाणार नाहीत. गृहमंत्री राजनाथ सिंग आणि पाकिस्तानातील भारताचे राजदूत अजय बिसारिया यांच्यातील चर्चेत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याशी संबधित कोणतेही पुरावे मागितल्यास स्पष्ट शब्दांत नकार देण्याची सूचना गृहमंत्र्यांनी राजदूत बिसारियांना केल्याचे सांगण्यात येते.

पुलवामा हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे भारत जगाच्या विविध देशांना सोपविणार आहे. पुलवाम हल्ल्याची सत्य जगासमोर मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्याची तयारी भारताने चालविली आहे. गृहमंत्री आणि राजदूतांच्या चर्चेत याबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

पुलवामा हल्ल्याकरता पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना मदत केली होती असे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. भारताने पुराव्यांनिशी पुलवामा हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करावा असे विधान पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केले होते.

संयुक्त राष्ट्रसंघाकडून निंदा

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे. संबंधित विभागांनी गुन्हेगारांना शिक्षा मिळवून द्यावी. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बाचेलेत हे जवानांच्या हौतात्म्याचे वृत्त ऐकून दुःखी झाल्याचे विधान मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाचे प्रवक्ते रुपर्ट कोलविले यांनी म्हटले आहे.

उपखंडात तणाव

जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर पुलवामाच्या पिंगलान भागात झालेल्या चकमकीत सैन्याचे 4 जण हुतात्मा झाले होते. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी मारले गेले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे उपखंडात असुरक्षिततेची स्थिती वाढणार नसल्याची अपेक्षा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखाने व्यक्त केली आहे.

250 काश्मिरींसाठी ‘मददगार’ ठरले सीआरपीएफ

सीआरपीएफच्या श्रीनगर येथील ‘मददगार’ या हेल्पलाईनने आतापर्यंत देशभरातून 250 काश्मिरी विद्यार्थी तसेच कर्मचाऱयांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविले आहे. देहरादून, चंदीगढ, दिल्ली समवेत अन्य शहरांच्या विद्यार्थ्यांनी मदत मागितली होती. सोमवारी 250 विद्यार्थी जम्मूमध्ये पोहोचले होते. तेथे त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यानंतर त्यांना काश्मीरसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती सीआरपीएफने ट्विट करत दिली आहे.