|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाठलाग करून चोरटय़ाला पकडले

पाठलाग करून चोरटय़ाला पकडले 

सावंतवाडीतील घटना : होमगार्ड रोहन नाईक यांचे धाडस

सावंतवाडी:

शहरातील बसस्थानक परिसरातील मत्स्यविक्रेत्या महिलेची रोख रक्कम व साहित्य असलेली बॅग हिसकावून पळून जाणाऱया चोरटय़ाला पाठलाग करून होमगार्डने जेरबंद केले. मंजुनाथ नागाप्पा वडर (34, सध्या रा. गोठोस-कुडाळ, मूळ रा. कारवार) असे चोरटय़ाचे नाव आहे. मत्स्यविक्रेत्या महिलेने दिलेल्या
तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. होमगार्ड रोहन नाईक यांच्या धाडसाबद्दल होमगार्ड विभाग, नागरिक आणि पोलिसांनी कौतुक केले आहे. 

मूळ सांगेली-सनमटेंब येथील व सध्या सावंतवाडीत कुटुंबासमवेत राहणाऱया प्रशांती प्रकाश कदम या उदरनिर्वाहासाठी गेल्या कित्येक महिन्यापासून शहरात मत्स्यविक्री करतात. कदम या किरकोळ राहिलेले मासे विकण्यासाठी बुधवारी सायंकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी बसस्थानक परिसरात बसल्या होत्या. त्याचवेळी तेथे थांबलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडील पैशाची पिशवी हिसकावून पळ काढला.

कदम यांनी ओरडाओरड केल्यावर बसस्थानकावर डय़ुटीवर असलेले होमगार्ड रोहन नाईक यांनी धाव घेतली. त्यांनी पळून जाणाऱया चोरटय़ाचा काही अंतरापर्यंत पाठलाग करत त्याला पेट्रोल पंपाजवळ पकडले. नागरिकांनीही चोरटय़ाचा पाठलाग केला. त्याची धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले. होमगार्ड रोहन नाईक (रा. कुडाळ) यांच्या धाडसाबद्दल त्यांचे होमगार्ड व सावंतवाडी पोलिसांनी कौतुक केले आहे.

चोरटय़ाचे नाव मंजुनाथ वडर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस झडतीत त्याच्याकडील रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. मात्र, बँक पासबुक, गॅस सिलिंडर बुक व अन्य साहित्याची पिशवी कुठे टाकली, याचा पोलीस शोध घेत आहेत. बसस्थानक व परिसरात यापूर्वी घडलेल्या चोरीत या चोरटय़ाचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास केला जाणार आहे.

Related posts: