|Thursday, September 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पुलवामा हल्ल्यानंतर…

पुलवामा हल्ल्यानंतर… 

पाकिस्तानने पोसलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 सैनिक हुतात्मा झाल्याची क्लेशदायक घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचा जगभरात निषेध करण्यात आला. अनेक मोठय़ा देशांनी भारताच्या पाठीशी आपण आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताच्या कानाकोपऱयात या घटनेचे प्रखर पडसाद उमटले व आजही उमटत आहेत. शहरोशहरी, गावोगावी पाकिस्तानचा निषेध करणारे मोर्चे, मेणबत्त्या मिरवणुका निघत आहेत. या मोर्चांना होणारी गर्दी ही कोणी राजकीय कारणास्तव जमवलेली नसून ती उत्स्फूर्त असल्याचा प्रत्यय जागोजागी येतो. यावरून भारताच्या संरक्षक दलांसंबंधी आपल्या जनतेला किंती आदर आहे हे समजून येते. ही अत्यंत दिलासादायक बाब निश्चितच आहे. अलीकडच्या काळात ‘देशभक्ती’ आणि तिचे ‘प्रदर्शन’ हे चेष्टेचे विषय ठरविण्याची चढाओढ स्वतःला विचारवंत म्हणवून घेणाऱयांमध्ये लागलेली आहे. देशभक्तीची भावना कोणत्याही कारणास्तव लोकांनी  कोणत्याही प्रकारे सामुहिकरित्या व्यक्त केली की या मंडळींना खूपच त्रास होतो असे दिसून येते. मग, ही देशभक्ती नसून हा उन्माद आहे. खरी देशभक्ती अशी रस्त्यावर उतरून प्रदर्शित करायची असते का? ती तर दैनंदिन वर्तणुकीतून प्रत्ययास यावयास हवी, असे अनेक साळसूद उपदेश केले जातात. मात्र हीच मंडळी ‘भारताचे तुकडे व्हावेत’ अशा घोषणा देत मिरवणुका काढणाऱयांचे मात्र समर्थन करताना दिसतात. नुसत्या देशविरोधी घोषणा दिल्या म्हणजे देशद्रोह केला असा अर्थ होत नाही. अशा घोषणा म्हणजे विचार स्वातंत्र्याचा आविष्कार आहे असा शहामृगी आणि दांभिक युक्तीवाद त्यावेळी केला जातो. अशा देशविरोधी घोषणा देणारे लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणती देशभक्ती कृतीतून व्यक्त करत असतात, याचा पंचनामा अशा घटनांमध्ये मात्र केला जात नाही. तथापि, सर्वसामान्य माणसे अशा विसंगतीग्रस्त विचारांना फारसे महत्त्व देत नाहीत. ती आपल्या देशभक्तीपर भावना त्यांना योग्य वाटेल अशा प्रकारे व्यक्त करीत असतात. काहीवेळा मात्र या भावनांची लक्ष्मणरेषा ओलांडली जाते. तसा प्रकार सध्याही पहावयास मिळत आहे. देशात काही ठिकाणी शिक्षणासाठी किंवा कामासाठी रहात असलेल्या काश्मीरी विद्यार्थी किंवा इतर लोकांना या पुलवामा हल्ल्यानंतर मारहाण केल्याचे प्रसंग घडले आहेत. काश्मीरला परत जा, असे त्यांना सांगण्यात आल्याचे काही ठिकाणच्या वृत्तांमधून समजत आहे. ही बाब समर्थनीय नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची शिक्षा त्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱया पाकिस्तानला व्हावयास हवी, हे निश्चित आहे. ती शिक्षा त्यांना देण्यासाठी आपली सेना दले आणि सरकारही सक्षम आणि समर्थ आहे. त्यामुळे ही शिक्षा देण्याची आपली जबाबदारी आहे, असे सर्वसामान्यांनी समजण्याचे कारण नाही. अशा घटनांचे समर्थन करता येत नाही. पुलवामासारखी घटना घडली की समाजमाध्यमांवरून अनेक अफवांचे मोहोळ जाणीवपूर्वक उठविले जाते. त्याला बळी पडून असे प्रकार केले जातात. काही वर्षांपूर्वी देशाच्या ऊर्वरित भागांमध्ये राहणाऱया ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांवरही असा प्रसंग ओढवला होता. अनेक विद्यार्थ्यांवर आपले शिक्षण सोडून आपल्या मूळ ठिकाणी परत जाण्याची वेळ आली होती. समाजमाध्यम क्रांतीचे जसे सुपरिणाम आहेत, तसे हे दुष्परिणाम आहेत. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी संयमाने वागण्याची आवश्यकता आहे. अन्यथा समस्या अधिक चिघळण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनीच असे प्रकार टाळण्याकडे लक्ष द्यावयास हवे. तथापि, येथे देखील काही बाबी समजून घ्यावयास हव्यात. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरींविरोधात घडलेल्या अशा घटनांवर अनेक राजकारणी आणि इतर विचारवंतांनी टीका केली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी हे काश्मीर आणि काश्मीरींविरोधातील कटकारस्थान असल्याचा शोध लावला आहे. असे केल्यास काश्मीरची जनता भारतापासून अधिकच दूर जाईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला. असा इशारा देणाऱयांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, तो असा की, प्रत्यक्ष काश्मीर खोऱयातून साधारण 25 वर्षांपूर्वी तेथील संपूर्ण हिंदू समाजाला आपले जन्मजात अधिकाराचे ‘वतन’ सोडून बाहेर पडावे लागले. त्यांना भारतात अन्यत्र आश्रय घ्यावा लागला. या प्रक्रियेत काश्मीरी हिंदूंची एक पिढी उद्ध्वस्त झाली. त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सरकारनेही लक्ष दिले नाही. हे हिंदू काही सुखासुखी तेथून बाहेर पडलेले नाहीत. त्यांचा छळ झाल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली. त्यावेळी आज इशारे देणारे राजकारणी आणि विचारवंत कोठे होते? काश्मीरींवर आज विशिष्ट प्रसंगामुळे ओढविलेली ही परिस्थिती कोणत्याही व्यापक कटकारस्थानामुळे निर्माण झाली आहे असे वाटत नाही. ही क्षणिक प्रक्षोभातून निर्माण झालेली प्रतिक्रिया आहे. त्यामुळे परिस्थिती लवकरच शांत होऊन पूर्ववत होऊ शकते. म्हणून तिचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे. इतरत्र राहणाऱया काश्मीरींना त्रास देणे हा सखोल कारस्थानाचा भाग असता तर पुलवामा हल्ल्याचे किंवा तशा प्रकारच्या घटनेचे निमित्त शोधणे आवश्यक ठरले नसते. इतर कोणत्याही वेळी असे प्रकार घडले असते आणि काश्मीरींना भारतात इतरत्र राहणे अशक्य करून सोडण्यात आले असते. हा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. तेव्हा काश्मीरसह भारताची जनता, सरकार, कोणतेही निमित्त शोधून त्यातून आपल्या राजकीय सोयीचा अर्थ काढणारे राजकारणी व कथित विचारवंत या सर्वच समाजघटकांनी संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काटय़ाचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच एकमेकांना समजून घेणे व भावनांचा आदर करून जबाबदारीने वागणे आपल्या प्रत्येकासाठीच आवश्यक आहे. हे कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे.