|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करा ; सचिन तेंडुलकर

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करा ; सचिन तेंडुलकर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळावे की नाही, हा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. बीसीसीआयने हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे. या प्रश्नावर आता भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपले मत व्यक्त केले आहे.

  सचिन म्हणाला की, ” भारताने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना मैदानात पराभूत करायला हवे. जर पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नाही तर आपल्याकडून त्यांना दोन गुण बहाल होतील. त्यामुळे मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. पण माझ्यासाठी देश जो निर्णय घेईल तोच योग्य असेल. आतापर्यंत भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा एकही सामना गमावलेला नाही.

   भारताचे माजी महान सलामीवीर सुनील गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले होते. गावस्कर म्हणाले की, पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये खेळू देऊ नये, त्यांच्यावर बंदी आणावी, असे काही जण म्हणत आहेत. पण ही गोष्ट तेवढी सोपी नाही. कारण भारत एकटा ही गोष्ट करू शकत नाही. जर भारताला पाकिस्तानवर बंदी आणायची असेल तर त्यांना अन्य काही देशांचाही पाठिंबा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळायचे ठरवले तर यामध्ये भारताचेच नुकसान आहे.