|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जागा हक्कपत्र न मिळाल्यास उपोषण

जागा हक्कपत्र न मिळाल्यास उपोषण 

वार्ताहर /चिकोडी :
तालुक्यातील पांगिरे ए गावातील 176 गरीब व जागा नसलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून 9 एकर जमीन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण तालुका पंचायतीच्या संबंधित अधिकाऱयांनी राजकीय लोकांचे ऐकून जागा हक्कपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याने पांगिरे ए ग्रामस्थांनी चिकोडीत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. पुढील 5-6 दिवसात जागा हक्कपत्र न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याबाबत आंदोलकांनी दिलेली व निवेदनात नमूद केलेली माहिती अशी की, चिखलव्हाळ (ता. चिकोडी) ग्रा. पं. हद्दीतील पांगिरे ए या गावात जागा नसल्याने लहान व भाडोत्री घरामध्ये राहणाऱयांची संख्या जास्त आहे. त्यासाठी गायरानमधील 9 एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व्हे नं. 19 मधील 176 लाभार्थ्यांना 30ƒ40 या आकारात असणारी गायरानातील जागा देण्याचे आदेश 3 सप्टेंबर 2012 रोजी दिले होते. त्यासाठी लाभार्थ्यांकडून 5 लाख रुपये भरण्यात आले आहेत. पण 5 लाखापेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्यांकडून वसूल केल्याची तक्रार लोकायुक्त न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. चौकशी करुन संबंधित लाभार्थ्यांना जागा देण्याची सूचना केली.
त्यानुसार सदर जमिनीवरील अतिक्रमणाची पाहणी तहसीलदारांनी केली. शिवाय लाभार्थ्यांच्या चौकशीचे आदेश तलाठय़ांना देऊन चौकशी केली. तसेच ता. पं. चे कार्यनिर्वाहक अधिकारी यांना 24 जानेवारी 2019 रोजी आदेश दिले होते. तरीही याकडे राजकीय स्वार्थापोटी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. 18 फेबुवारी 2019 रोजी ता. पं. चे कार्यनिर्वाहक अधिकारी यांना दुसऱयांदा आदेश देण्यात आले. पण अद्याप जागा वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर अधिकाऱयाला राजकीय पाठिंबा मिळाला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
येत्या 5-6 दिवसात ता. पं. च्या कार्यनिर्वाहक अधिकाऱयांनी जागा हक्कपत्राचे वाटप केले नाही तर चिकोडी येथे आमरण उपोषणाला प्रारंभ करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निवेदनप्रसंगी सुभाष कानडे, अलाबक्ष मुल्ला, सागर कानडे, आनंदा पडाडे, खंडू माळी, तात्यासो कानडे, महादेव हणबर, भरत कानडे, बापुसाहेब कानडे, विशाल परिट, संदीप हणबर, अमोल कानडे, आप्पासो हणबर, सुनील कानडे यांच्यासह आंदोलनकर्ते उपस्थित होते.