|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राऊत नको, जठार हवेतचा पुनरुच्चार

राऊत नको, जठार हवेतचा पुनरुच्चार 

भाजप तालुका कार्यकारिणीत प्रमोद जठारांच्या समर्थनार्थ ठराव : कार्यकर्ते, पदाधिकाऱयांची घोषणाबाजी

वार्ताहर / कणकवली:

शिवसेना – भाजपची युती झाली, तरी आम्हाला लोकसभा निवडणुकीत आमचा हक्काचा उमेदवार हवा. आम्हाला ‘राऊत नको जठार हवेत’, या मागणीचा पुनरुच्चार करीत कणकवली तालुका भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयासमोर जठार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देत प्रमोद जठार यांनी अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. रोजगार निर्मितीसाठी नाणार प्रकल्पाची बाजू केंद्रात व सरकारपर्यंत ठामपणे मांडण्यासाठी जठार हेच लोकसभेच्या रिंगणात हवेत. या समर्थनार्थ जरी पक्षाने आमच्यावर कारवाई केली, तरी त्याची आम्हाला फिकीर नाही, असेही भाजप पदाधिकाऱयांचे म्हणणे होते.

श्री. जठार यांच्या समर्थनार्थ भाजप तालुका कार्यकारिणीची बैठक येथील भाजप कार्यालयात झाली. बैठकीत जठार यांना पाठिंब्याचा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे यावेळी ठरविण्यात आले. राज्य व केंद्रात जरी युती करून निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला, तरी आम्हाला युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत मान्य नसल्याचा सूर पदाधिकाऱयांनी लावला. गेल्या साडेचार वर्षात श्री. राऊत यांनी रोजगाराच्या मुद्यावर कोणताही सकारात्मक विचार केला नाही. या उलट नाणारसारख्या रोजगार देणाऱया प्रकल्पाला विरोध करण्याचे काम केले. जर नाणार प्रदूषणकारी प्रकल्प आहे, असे म्हणणे असेल तर सी-वर्ल्ड प्रकल्प का केला नाही? असा सवाल करण्यात आला.

शिवसेनेने गेल्या साडेचार वर्षात भाजपला जिह्यात विश्वासात न घेता भाजप पदाधिकाऱयांचा मतांसाठी वापर करून घेतला. ही शिवसेनेची वृत्ती आता खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेटय़े यांनी दिला. प्रमोद जठार यांनी गेल्या चार वर्षात भाजपच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली असून, त्यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या पाठिशी आम्ही पक्ष विसरून उभे राहू, असा निश्चय पदाधिकाऱयांनी व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षात राऊत यांनी काय केले? युतीचे उमेदवार म्हणून श्री. राऊत यांना आम्ही पाठिंबा देणार नाही. त्यांचे कामही या निवडणुकीत करणार नाही, असा इशारा शिशीर परुळेकर, परशुराम झगडे यांनी दिला. यावेळी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘अबकी बार, प्रमोद जठार’ असा नारा दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष संदेश पटेल, उपजिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा ढवण, नगरसेवक कन्हैया पारकर, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष रमेश पावसकर, महिला तालुकाध्यक्ष गितांजली कामत, महेश सावंत, प्राची कर्पे, बीडवाडी सरपंच सुदाम तेली, अरविंद कुडतरकर, चंद्रकांत हरयाण, अनंत तानवडे, समर्थ राणे, बाळा पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.