|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘सन्मान निधी’ साठी 52,466 शेतकरी पात्र

‘सन्मान निधी’ साठी 52,466 शेतकरी पात्र 

  • प्रतिलाभार्थी वार्षिक सहा हजारचा मिळणार लाभ
  • ओरोस येथे उद्या योजनेचा शुभारंभ

प्रतिनिधी / ओरोस:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्हय़ातील 52,466 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱयांना तीन टप्प्यात वर्षासाठी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

 दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा शुभारंभ होणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 10 शेतकऱयांना पहिल्या टप्प्याच्या लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरावर या कार्यक्रमाचे एकाचवेळी आयोजन केले जाणार असून प्रत्येक कार्यक्रमात 10 शेतकऱयांना उपस्थित ठेवून योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

 अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱयांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. 4 फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार 20 फेब्रुवारीपर्यंत संबंधित शेतकऱयांची यादी करून त्यावर हरकती घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर दुरुस्त करण्यात आलेली यादी दोन दिवसात जाहीर करावी 26 तारीखपर्यंत केंद्र शासनाच्या संकेत स्थळावरही ती अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 जिल्हय़ात 4 लाख 49 हजार 565 शेतकरी आहेत. एकूण 757 गावांमधील या योजनेच्या निकषानुसार 52,466 शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. प्रत्यक्ष लाभ देण्याच्या कार्यवाहीसाठी केंद्र शासनाने कामाला लागण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 रोजी सकाळी 10.30 वाजता उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर येथून होणार आहे. याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. मात्र, शेतकऱयांशी पंतप्रधान यावेळी ‘मन की बात’ करून मनमोकळा संवाद साधणार आहेत. जिल्हय़ातील हा औपचारिक शुभारंभ कार्यक्रम संबंधितांनी वेळेला पार पाडावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.