|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला?

पालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला? 

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची दीपक केसरकरांवर टीका

वार्ताहर / कणकवली:

जिल्हय़ातील जनतेला आतापर्यंत सत्ताधाऱयांनी रोजगाराची दिलेली किती आश्वासने पूर्ण झाली? गेल्या साडेचार वर्षात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनाच्या माध्यमातून किती जणांना रोजगार उपलब्ध करून दिला? चष्म्याच्या कारखान्यापासून ते आयटी इंडस्ट्रीज करण्यापर्यंत अनेक घोषणा करण्यात आल्या. काथ्या उद्योगातून रोजगार निर्मितीची आश्वासने देण्यात आली. मात्र, आतापर्यंत या साऱया घोषणातून किती बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळाला, याची आकडेवारी पालकमंत्र्यांनी जाहीर करावी, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर, प्रशांत बागवे, परळ संघटना सचिव नंदू घाडीगावकर आदी उपस्थित होते.

श्री. उपरकर पुढे म्हणाले, मार्च एंडसाठी ज्याप्रमाणे अधिकारी कागदपत्र नाचविण्याची घाई करतात. त्याचप्रमाणे निवडणुका आल्यानंतर राजकीय पक्षांचे आमदार, खासदार व सत्ताधारी घोषणाबाजी करत अधिकाऱयांच्या बैठकींचा सपाटा लावतात. स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी न घेताच रस्त्यांच्या कामांची उद्घाटने करण्याचे काम सत्ताधाऱयांकडून सुरू आहे. पालकमंत्री अधिकाऱयांच्या सुट्टी दिवशीही बैठक घेत असून, अशा बैठकांमधून केवळ वांझोटय़ा चर्चांपेक्षा फारसे काही निष्पन्न होत नाही.

गळक्या इमारतींच्या कामांची उद्घाटने सत्ताधाऱयांकडून करण्यात येत असून, आचारसंहितेपूर्वी उद्घाटने करून श्रेय मिळविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱयांकडून केला जात आहे. मात्र, सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे. अशा भूलथापांना बळी न पडता जनता याला मतपेटीतून चोख उत्तर देते, हा जिह्याचा इतिहास आहे. पालकमंत्र्यांनी रोजगाराची आकडेवारी जाहीर करावी व आमने सामने येऊन चर्चा करावी. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी आडाळीत एमआयडीसी व गारमेंट इंडस्ट्री आणण्याची घोषणा केली. तर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून जिह्यात आयुर्वेदीक रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली. आताचे पालकमंत्री निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा रोजगार देणार घोषणा करून मोकळे झाले. त्यामुळे अशा फसव्या घोषणा व आश्वासनांना लोकसभा निवडणुकीत जनता सडेतोड उत्तर देईल, असे श्री. उपरकर म्हणाले.