|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ

आचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ 

जि. प. अध्यक्षांच्या हस्ते झाले उद्घाटन 

शोभायात्रेने महोत्सवात रंगत

आचरा किनारी फूड फेस्टिव्हल

वार्ताहर / आचरा:

पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी आयोजित आचरा गोल्डन बीच महोत्सवाची सुरुवात ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेने झाली. रंगतदार ठरलेल्या या शोभायात्रेत आचरावासीय, पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते. ढोलताशांचे पथक, चित्ररथ, वेशभूषा स्पर्धेसाठी नटलेली लहान-लहान शाळकरी मुले यामुळे ही शोभायात्रा आकर्षक बनली होती. दुपारी आचरा तिठय़ावरून सुरू झालेल्या शोभायात्रेचा आचरा बाजारपेठ, भंडारवाडी, गाऊडवाडीमार्गे आचरा बीचवर समारोप करण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाले. महोत्सवाचा पहिला दिवस कवी संमेलने, सूरयात्रा, शाळकरी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, समूहन्यृत्य स्पर्धा यामुळे रंगतदार झाला.

शोभायात्रेत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जि. प. बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, आचरा सरपंच प्रणया टेमकर, महोत्सव समिती उपाध्यक्ष अनिल करंजे, रवींद्र गुरव, माजी सभापती नीलिमा सावंत, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अभिजीत सावंत, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, मंगेश टेमकर,
ग्रामपंचायत सदस्य जगदीश पांगे, अशोक गावकर, विजय कदम, डॉ. प्रमोद कोळंबकर, शेखर मोर्वेकर सहभागी झाले होते.

आकर्षक चित्ररथ

  आचरा तिठा येथून निघालेल्या शोभायात्रेत मालवण येथील महिलांचे स्वराज ग्रुप ढोलपथक सहभागी झाले होते. तसेच आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. आचरा बालगोपाळ मंडळाचा नरसिंह अवतार, आचरा केंद्रशाळेचा सीमेवरील जवान, आचरा इंग्लिश मीडियम स्कूलचा शिवाजी महाराज, पिरावाडी हायस्कूलचा विविधतेतून एकता, पिरावाडी प्राथमिक शाळेचा पर्यटनातून समृद्धी, आचरा पशूवैद्यकीय दवाखान्याचा शेळीपालनाचा संदेश देणारा चित्ररथ सहभागी झाला होता.

अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

 महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, जि. प. सदस्या श्रेया सावंत, सरपंच
प्रणया टेमकर, माजी सभापती नीलिमा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रफुल्ल प्रभू, शेखर मोर्वेकर, हेमंत कुबल, कपिल गुरव, डॉ. जाधव उपस्थित होते.

कवीसंमेलन, स्वरयात्रा व समूहनृत्याने रंगत

 उद्घाटनानंतर सुरू झालेल्या कवी संमेलन, ज्येष्ठ नागरिकांची स्वरयात्रा, शाळकरी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व समूहनृत्य स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आली. यावेळी
प्रसिद्ध कवी, गझलकार मधुसदन नानिवडेकर, रुजारिओ पिंटो, बाळ कदम यांच्या कवितांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नवकवीही यात सहभागी झाले होते. यावेळी आचरा बीचवर मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलवर उपलब्ध असलेल्या मालवणी पदार्थांचा खवय्यांनी मनमुराद आनंद लुटला.

आज होणार आचरा जल्लोष

  महोत्सवाच्या दुसऱया दिवशी रविवार 24 फेब्रुवारीला महिलांसाठी खास आकर्षण असलेला ‘स्मार्ट लेडी’ हा कार्यक्रम, त्यानंतर शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री आठ वाजता सांगता सोहळा होणार आहे. त्यानंतर रात्री 9 वाजता ‘जल्लोष आचरा’ हा सांगतेचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कलाकार पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी, विनोदवीर कॉमेडी किंग अंशुमन विचारे, विशाखा सुभेदार, हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे सर, तसेच त्यांच्यासोबत ‘मराठी सारेगमप’फेम वाद्यवृंद, कमलेश भडकमकर, मधुरा कुंभार, जितेंद्र तुपे या ‘सूर नवा, ध्यास नवा’फेम गायकांची ‘संगीत रजनी’ कार्यक्रम होणार आहे.