|Sunday, March 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कसा झाला ‘स्ट्राईक’?

कसा झाला ‘स्ट्राईक’? 

26 फेब्रुवारीची पहाट ही पाकिस्तानी लष्कराला, आयएसआयला आणि या राष्ट्रातील तमाम दहशतवादी गटांना सदैव लक्षात राहणारी ठरेल. कारण या दिवशी भारताने इतिहासात पहिल्यांदा दहशतवादी हल्ल्यांचे प्रतिरोधन करण्यासाठीच्या कारवाईमध्ये हवाई दलाचा वापर केला. अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि अचूक नियोजनाच्या साहाय्याने केलेली ही कारवाई अतिशय उत्तम दर्जाची होती. या कारवाईमध्ये आपले 12 मिराज 2000 एअरक्राफ्ट हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जवळजवळ 80 किलोमीटर आतमध्ये घुसले आणि तेथील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळांवर तुफान बॉम्बवर्षाव केला. हा हल्ला बालाकोटा  येथे झाला. या बालाकोटामध्ये जैशचा सर्वात मोठा टेनिंग कॅम्प आहे. हा कॅम्प 2001 मध्ये जैशचा म्होरक्मया मौलाना मसूद अजहरने बनवला होता. ताज्या कारवाईत तो बेचिराख करण्यात आला. भारतीय वायुदलाने ही संपूर्ण कारवाई अवघ्या 21 मिनिटात केली आणि भारतीय लढाऊ विमाने अत्यंत सुखरूपपणाने भारतीय हद्दीत परतली. या हल्ल्यासाठीची वेळ आपण खूप विचार करून निश्चित केली होती. पहाटेची 3:30 ची वेळ. ही वेळ साखरझोपेची असते. आपला दुष्मन गाढ झोपलेला होता. अशा वेळी ‘सरप्राईज ऍटॅक’ करत भारताने पाकिस्तानला एक जबरदस्त तडाखा दिला आहे.

या हल्ल्याची गरज होतीच. पुलवामावरील हल्ला ही ताजी घटना आहे. पण त्या पूर्वीपासून आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे टेनिंग कॅम्प आहेत हे पाकिस्तानला सांगत आलो आहोत. दहशतवाद्यांना टेनिंग देणे आणि भारतात पाठवणे बंद करा, हेही आपण पाकिस्तानला सातत्याने बजावत आलो आहोत. पण पाकिस्तान मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राहिला. 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही पाकिस्तानच्या कारवाया सुरूच राहिल्या. आता पुलवामामधील भ्याड हल्ल्यामुळे आपल्याला उत्तर देणे भाग पाडले. भारताने केलेला हा हल्ला एवढय़ा मोठय़ा प्रमाणात केला की बालाकोटचा कॅम्प तर उद्ध्वस्त झालाच या व्यतिरिक्त हिजबुल मुजाहिद्दीनचे जे छोटे छोटे कॅम्प होते तेही बेचिराख झाले. ही कारवाई भारताची खूप मोठी उपलब्धी आहे. कारण आपली जराशीही जीवित वा वित्तहानी न होता ही बाराही विमाने ‘मिशन फत्ते’ करून परतली. बालाकोट हा खूप पहाडी आणि खडकाळ प्रदेश आहे. हे भौगोलिक स्थान लक्षात घेऊनच मसूद अझहरने 2001 एकमध्ये तिथे प्रशिक्षण तळ उभारला. येथे टेनिंग करून जैशचे दहशतवादी लाँच पॅडवर येतात आणि तेथून हे लोक आपल्या देशात येतात.

 सीमाभागातील टेहळणी करण्यासाठी भारताला अवकाशात प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांचीही मदत होत आहे. या उपग्रहांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळय़ा भागांची छायाचित्रे उपलब्ध होत असतात. त्यातूनच या टेनिंग कॅम्पचा नेमका ठावठिकाणा समोर आला असावा. त्यानंतर त्यावर प्रोग्रॉमिंग केले जाते. आपली विमाने उड्डाण करतानाच टार्गेट ऍक्वायर करतात आणि यानंतर रडार टार्गेट लॉक केले जाते. एकदा टार्गेट लॉक झाले की केवळ बटण प्रेस केल्यानंतर आपले मिसाईल डागले जातात. या मिराज विमानांमधील नेव्हिगेशन प्रणाली अत्याधुनिक असल्यामुळे हे हल्ले निर्धारित लक्ष्यावर अत्यंत अचूकपणाने झाले आहेत. हल्ला झाला त्यावेळी कॅम्पमध्ये जैशचे सर्व कमांडर होते. हल्ल्यात मारला गेलेला मौलाना युसुफ अजहर हा मसूद अजहरचा नातेवाईक आहे. याखेरीज त्याचा मोठा भाऊही मारला गेल्याचे समोर आले आहे.

या डोंगराळ भागात विमानांनी हल्ला करण्यासाठी अत्यंत चोख आणि अचूक नियोजनाची गरज असते. मुख्य म्हणजे हल्ल्यापूर्वीच्या तयारीसाठी मिळवण्यात येणारी माहिती ही अत्यंत चोख असावी लागते. तसेच मिळालेल्या माहितीची पडताळणी करून घेणे आवश्यक असते. त्यानंतरच आपण हल्ला करू शकतो. हा हल्ला यशस्वी झाला आहे आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत याचा अर्थ आपली गुप्तहेर माहिती अतिशय उत्तम होती. वास्तविक, पुलवामा हल्यानंतर 12 दिवस आपण यासाठी नियोजन करत होतो. या काळात आपण पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाब वाढवत होतो. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी सिंधु नदी पाणीवाटप करारातील आपल्या वाटय़ाचे पाणी वापरण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला गेला. हे सर्व करत असतानाच या एअर ऍटॅकचे नियोजन सुरू होते. आपल्या सर्व महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणा यासाठी कामाला लागल्या होत्या. त्यामुळेच आपल्याला 100 टक्के यश मिळाले आहे. पुलवामाप्रमाणे आणखीही हल्ले होऊ शकतात, अशी गुप्तचर माहिती मिळालेली असल्यामुळे आत्ताच हा एअर स्ट्राईक करणे आवश्यक आहे.

 2016 मध्ये जेव्हा उरीवर हल्ला झाला होता आणि त्याला आपण प्रत्युत्तर दिले होते. तेव्हाही आपल्याकडे एअर स्ट्राईक करण्याचा पर्याय होता. पण त्यावेळी आपल्या लष्कराने हल्ला केला. कारण त्यावेळी लाँच पॅडवरील अतिरेकी मारणे गरजेचे होते. आता केलेला हल्ला आपण मुख्य टेनिंग कॅम्पवर केलेला आहे. त्यामुळे जैश ए मोहम्मदसह अन्य दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान यांच्या उरात धडकी भरली नसेल तरच नवल !

 

Related posts: