|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, मी संघाचा सच्चा कार्यकर्ता, देशसेवा हेच आमचे मिशन : नितीन गडकरी

मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, मी संघाचा सच्चा कार्यकर्ता, देशसेवा हेच आमचे मिशन : नितीन गडकरी 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली :

 केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येईल, अशी राजकीय चर्चा सध्या सुरु आहे. तसेच सत्ताधारी भाजपच्याच काही नेत्यांची अशी मागणीदेखील आहे. याबाबत नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात गडकरींना प्रश्न विचारले असता, यावर गडकरी म्हणाले की, “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बिलकुल नाही, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा कार्यकर्ता आहे. केवळ देशासाठी काम करणे हे आमचे मिशन आहे.”

लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. परंतु केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचीदेखील पंतप्रधानपदासाठी चर्चा आणि मागणी होत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकू स्थिती झाली तर इतर पक्षातील नेत्यांच्या सहमतीने सरकार उभे करण्यासाठी पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचे नाव पुढे येऊ शकते. या शक्यतेवर गडकरींनी त्यांचे मत स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, “या शक्यता, चर्चा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत.”  गडकरी म्हणाले, “माझे पंतप्रधानपदाशी काहीही देणेघेणे नाही. मी संघाचा कार्यकर्ता आहे. देशसेवा हे आमचे मुख्य कर्तव्य आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास होत आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोतच. त्यामुळे मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील.”  निवडणुकांच्या त्रिशंकू स्थितीबाबत गडकरी म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमतासह सत्तेत येईल. मी स्वतः मागील निवडणुकीत साडेतीन लाख मतांनी जिंकलो होतो, यावेळी पाच लाख मतांनी निवडणूक जिंकेन.”