|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अभिनंदन तंदुरुस्त, काश्मीर अशांतच

अभिनंदन तंदुरुस्त, काश्मीर अशांतच 

कुटुंबियांसह संरक्षणमंत्र्यांनी इस्पितळात घेतली भेट

नवी दिल्ली, श्रीनगर / वृत्तसंस्था

पाकिस्तानातून भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर सध्या दिल्लीतील हवाई दलाच्या मध्यवर्ती वैद्यकीय इस्पितळात (एएफसीएमई) उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती हळूहळू पूर्वपदावर येत असून त्यांच्या उजव्या डोळय़ाच्या खालील भागात अजूनही सूज कायम आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, भारतीय वायुदल प्रमुख बी. एस. धनुआ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी अभिनंदन यांची शनिवारी भेट घेतली. पाकिस्तानात नेमके काय घडले, याबाबतची सविस्तर माहिती अभिनंदन यांनी यावेळी संरक्षणमंत्री आणि वायुदल प्रमुखांना दिली. दरम्यान, एकीकडे देशभर अभिनंदनचे कौतुक सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तानकडून गोळीबाराच्या फैरी सुरूच आहेत. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने काश्मीर अशांत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांचे शुक्रवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दिल्लीत आगमन झाले होते. दिल्लीत आल्यानंतर त्यांना थेट वैद्यकीय चाचण्यांसाठी लष्करी इस्पितळात नेण्यात आले. त्यापासून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले असून सध्या ‘कुलिंग डाऊन प्रोसेस’ सुरू आहे. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतील  वायुदलाच्या मुख्यालयात अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता आणखी काही चाचण्या केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. अभिनंदन यांची वैद्यकीय आणि मनोवैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. तूर्तास त्यांचा मुक्काम वायूदल अधिकाऱयांच्या मेसमध्येच असणार असल्याचे सांगण्यात आले. शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा पूर्णपणे सक्षम झाल्यानंतर त्याच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

सीमेवरील तणाव कायम

अभिनंदन वर्धमान भारतात परतले असले तरी दोन्ही देशांमधील तणाव अद्याप कमी झालेला नाही. पुंछमध्ये रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून गोळीबारात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन चिमुरडय़ांचा समावेश आहे. दोघे गंभीर जखमी आहेत. पाकिस्तानी सैन्यांकडून एका आठवडय़ात 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीचा भंग करून सीमेवर जोरदार गोळीबार आणि तोफांचा मारा करीत आहे. त्यात काही नागरिक जखमी झाले असून, तर अनेक स्थानिकांनी स्थलांतर केले आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्कच

भारताची सुरक्षा यंत्रणा सज्ज असून, सीमेनजीक अरबी समुद्रात पाणबुडी अजूनही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. भारताने आपली तयारी कायम ठेवली असून, भारताची ताकद असलेली आयएनएस कलावरी ही पाणबुडी सज्ज ठेवली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर जम्मू सेक्टरमध्ये जवानांना तैनात ठेवले आहे. अभिनंदन भारतात परतल्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांनी आम्ही कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

एफ-16 चा वापर भारताविरोधात केलाच कसा?

अमेरिकेने पाकिस्तानकडे मागितले उत्तर : कराराचा भंग झाल्याचे स्पष्ट

पाकिस्तानने बालाकोट येथील हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या हल्ल्यावेळी वापरण्यात आलेल्या लढाऊ विमानामुळे पाकिस्तान अडचणीत आले आहे. एफ-16 ही विमाने अमेरिकेने दहशतवादविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानला दिली होती. पण, पाकिस्तानकडून त्यांचा गैरवापर झाल्याचे उघड झाल्याने अमेरिकेने याबाबत पाकिस्तानला जाब विचारला आहे. तसेच त्यामुळे आता अमेरिका पाकिस्तानवर कारवाई करण्याची शक्मयता आहे.

अमेरिका-पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार एफ-16 विमानांचा वापर पाकिस्तानने अंतर्गत घातपाती कारवाया आणि मुख्यत्वे दहशतवाद रोखण्यासाठी करणे बंधनकारक होते. या विमानांचा योग्य वापर व्हावा यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर अनेक निर्बंधही घातले होते. पण, पाकिस्तानने हे विमान भारतावर हल्ला करण्यासाठी वापरल्याचे उघड झाले आहे. भारताने एफ-16 चे अवशेष दाखवल्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आला. यासंबंधी आम्ही त्यांच्याकडे आणखी माहिती मागितली आहे असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.

मिराज हल्ल्याचे पुरावे उघडकीस…चार इमारती उद्ध्वस्त

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱया जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. याबाबतचे पुरावे आता उघडकीस येऊ लागले असून या हल्ल्यात मदरसा तालीम-उल-कुराणच्या चार इमारतींचे नुकसान झाले आहे. गुप्तचर यंत्रणांकडे सिथेंटिक अपर्चर रडारच्या (एसएआर) सहाय्याने घेण्यात आलेली छायाचित्रे पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये टार्गेट करण्यात आलेल्या चार इमारतींना मिराज-2000 ने पाच ए-2000 प्रिसिजन गायडेड म्युनिशनच्या (पीजीएम) सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

कमांडर, हस्तकांचा खात्मा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, एका इटालियन पत्रकाराने केलेल्या दाव्यानुसार भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवादी संघटनांचे कमांडर आणि बडे हस्तक ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इटलीच्या रोम येथील एका पत्रकाराने बालाकोट येथील स्थानिकांशी संवाद साधल्यावर यासंबंधीचा अहवाल प्रकाशित केला आहे. हल्ला झालेली जागा सध्या पाकिस्तानी लष्कराने सील केली आहे. त्यामुळे कोणतीही माहिती मिळवणे गुप्तचर यंत्रणांसाठी अवघड बनले आहे. त्यामुळे एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा स्पष्ट होत नाही.

स्वतःच्याच वैमानिकाला पाकिस्तानींनी ठेचून मारले

27 फेब्रुवारीच्या सकाळी भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने धडकली होती. यावेळी पाकिस्तानचे एफ-16 आणि भारताचे मिग-21 विमान खाली कोसळले होते. दोन्ही विमानातील जवान पॅराशूटच्या सहाय्याने सुखरुप खाली उतरले होते. यापैकी पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरुप भारतात परतले. मात्र पाकिस्तानी वैमानिकाला मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे चार दिवसांनंतर उघड झाले आहे. पॅराशूट उतरलेल्या भागातील पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून आपल्याच देशाच्या वैमानिकाला ठेचून मारल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे वैमानिक शाहनाज एफ 16 विमानाचं उड्डाण करत होते. शाहनाज सुखरुप खाली उतरण्याआधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेश फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शाहनाज यांचा मृत्यू झाला होता. शाहनाज याचेही कुटुंब सैन्यात आहे. त्यांचे वडील पाकिस्तानी हवाई दलात होते.

 

Related posts: