|Monday, September 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘गजालीन खाल्लो घो’ रंगभूमीवर

‘गजालीन खाल्लो घो’ रंगभूमीवर 

 प्रभाकर भोगले ज्येष्ठ नाटककार. त्यांचे रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘गेले भजनाक पोहचले लग्नाक’ हे नाटक बहुचर्चित झाले. मात्र भोगले यांचे नाव अधिक चर्चेला आले ते झी टिव्हीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या बहुचर्चित मालिकेचे कथा लेखक म्हणून. आता त्यांच्या कथांवर रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘गजालीन खाल्लो घो’ हे मालवणी बोलीतील नाटक रंगभूमीवर आले आहे.

या नाटका संदर्भात बोलताना भोगले म्हणतात, हे नाटक माझ्या मालवणी विनोदी कथांवर आधारित नवे नाटक आहे. काही वर्षापूर्वी माझा ‘इरसाल गजाली’ हा मालवणी बोलीतील कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याला त्या वषीचा कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला. हा कथासंग्रह लोकप्रिय झाला आणि त्याच्या तीन आवृत्या निघाल्या. तो संग्रह दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्या वाचनात आला आणि त्यांनी या कथांचं नाटय़ रुपांतर करण्याचा विचार मला बोलून दाखविला. माझ्या ‘गेले भजनाक पोचले लग्नाक’ या लोकप्रिय ठरवलेल्या नाटकाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलेलं असल्याने मी त्यांना परवानगी दिली.या नाटकाचा एक प्रयोग मराठी नाटय़स्पर्धेसाठी मुंबई रवींद्रनाथ नाटय़गृहात झाला. त्यानंतर आता हे नाटक मराठी रंगभूमीवर आले आहे.

या नाटकात काम करणारे कलाकार नव्या दमाचे, प्रचंड उर्जा असलेले तसेच उत्तम मालवणी बोलणारे आहेत. या नाटकात मी मालवणी मुलखाचं, बोलीचं, माणसांचं तसंच वस्तूस्थिती सांगणारी दोन गाणी असून ती भोगले यांनीच लिहिली आहेत. राजा दळवी यांनी या गाण्यांना सुंदर चाली दिल्या आहेत. ही गाणी नाटकात पडद्यावर सादर केली जातात. या नाटकातल्या कथा तुफान विनोदी असून रघुनाथ कदम यांनी त्यांची मांडणी उत्तम प्र्रकारे केली आहे. यात व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार अगदी धमाल उडवून देतात.

 लेखक आपल्या गावात घडलेले किस्से सांगतो आहे अशी संकल्पना या नाटकाची आहे. यात लेखकाची म्हणजे प्र्रभाकर भोगले यांची भूमिका राजा दळवी करीत आहेत. ते पुढे घडणाऱया कथानकाची पार्श्वभूमी सांगतात आणि मग तो    प्रसंग मंचावर सादर होतो. दिग्दर्शक कदम म्हणतात, भोगले यांचे नाटय़ लेखनाची शैली उत्तम आहे. त्यांच्या रंगभूमीवर सादर झालेल्या आधीच्या ‘गेले भजनाक पोचले लग्नाक’ नाटकाने स्वतःचा रसिक वर्ग मिळवला आता या ‘गजालीन खाल्लो घो’ या नाटकालाही रसिकांची पसंती मिळेल असा विश्वास वाटतो!