|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीतील भैरीबुवाच्या मंदिरात सापडली प्राचीन नाणी

रत्नागिरीतील भैरीबुवाच्या मंदिरात सापडली प्राचीन नाणी 

वार्ताहर/ रत्नागिरी

रत्नागिरीचे बारा वाडय़ांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरु असताना एका खांबामध्ये पुडीत बांधून ठेवलेली 6 पुरातन नाणी आढळून आली आहेत. दुरुस्तीदरम्यान मंदिराचे जुने खांब बदलताना एका खांबामध्ये तीन शिवकालीन व तीन ब्रिटीशकालीन अशी एकूण सहा नाणी सापडली आहेत. मंदिर बांधकामाच्या वेळेला एखाद्या भक्ताने किंवा प्रथा म्हणून ही नाणी ठेवलेली असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे.. 

  सुमारे तीनशे वर्षांपूर्वी श्री भैरी मंदिराची उभारणी झाली. त्यानंतर 1833 मध्ये या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. 1833 मध्ये केलेल्या बांधकामाची  दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. यामध्ये एक फूट बाय एक फूटाचे 6 खांब व त्यावरील सर्व सांगड बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जुने खांब बदलताना ही नाण्यांची पुडी खांबाच्या खोबणीत आढळून आली. या मंदिराच्या 1833 मधील जीर्णोद्धाराच्या वेळी एखाद्या भक्ताने किंवा काही धार्मिक विधीचा भाग म्हणून ही नाणी खांबाच्या खोबणीत ठेवली गेली असावीत, असा अंदाज आहे. 

 खांबामध्ये आढळलेल्या नाण्यांमध्ये 3 शिवकालीन नाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 च्या दरम्यान राज्याभिषेकापूर्वी पहिले चलन प्रसिद्ध केले. या नाण्यावर ‘जी’ व ‘सी’ अशी अक्षरे होती. हे स्वराज्याचे पहिले नाणे होते, असा संदर्भ सांगण्यात येतो. श्री भैरी मंदिरात आढळलेल्या नाण्यांपैकी एका नाण्यावर जी अक्षर असून या नाण्याचे वजन सुमारे पाऊण तोळा आहे. अन्य एका नाण्यावर 5 आकडा आणि तलवार आहे तर तिसऱया नाण्यावर राजमुद्रा आढळते. यामुळे ही शिवकालीन नाणी असावीत, असा प्राथमिक निष्कर्ष काढला जात आहे. लवकरच अभ्यासाअंती यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे.

 तीन शिवकालीन नाण्यांबरोबरच तीन ब्रिटीशकालीन नाणीही या पुडीमध्ये आढळून आली आहेत. या नाण्यांवर क्वार्टर आना व हाफ आना म्हणजे पावकी, निमकी असे लिहिलेले आहे. या नाण्यांवर तराजूचे चित्र असून दुसऱया बाजूला इस्ट इंडिया कंपनी व या कंपनीचे दोन सिंहांचे बोधचिन्ह स्पष्टपणे दिसत आहे. अध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्टय़ा श्री भैरी मंदिराचे योगदान अनन्यसाधारण आहे. शिवाय मंदिराला लाभलेल्या ऐतिहासिक वारशामध्ये या नाण्यांनी आणखी भर टाकल्याने या मंदिराचे महत्व आणखी वाढणार आहे.