|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘आपला दवाखाना’ योजनेतून राज्यात 60 दवाखाने सुरू

‘आपला दवाखाना’ योजनेतून राज्यात 60 दवाखाने सुरू 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हय़ातील म्हासुर्लीसारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवण्यात युती सरकारला यश आले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यात 151 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू आहेत. जनतेला जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी ‘स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेतून 60 दवाखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूरचे सेवा रुग्णालय हे खासगी रुग्णालयापेक्षाही चांगली, दर्जेदार सेवा देणारे रुग्णालय आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

लाईन बझार येथील सेवा रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन मंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी डी. बी. देसाई, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. पी धारूलकर, एनयूएचएमचे डॉ. सतीश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री शिंदे म्हणाले, आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दुर्गम भागात आरोग्य विभागाची भरारी पथके सेवा देत आहेत. कोल्हापुरातील सेवा रूग्णालयाचा राज्यात लौकीक आहे. या रूग्णालयाचा आदर्श अन्य शासकीय रूग्णालयांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षांत युती सरकारने आरोग्यासोबत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. सहा महिन्यांत 100 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जाणाऱया रूग्णांच्या 60 नातेवाईकांसाठी परळला सोय केली आहे. आता 200 जण राहतील, अशी व्यवस्था शिवडीला करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यास प्राधान्य : पालकमंत्री

 मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत 110 कोटी रुपये रुग्णांवर खर्च केले आहेत. सरकारी दवाखाना असणारे हे सेवा रुग्णालय अतिशय चांगली स्वच्छता असणारे रुग्णालय असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा रूग्णालयाच्या लिफ्टचे काम उद्यापासून सुरू करा, त्यासाठी ‘सीएसआर’मधून मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वागत केले. सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, ‘सीपीआर’च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. विलास देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता धनंजय भोसले, शाखा अभियंता ए.बी. पोळ, डॉ. थोरात यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.