|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘मिग-21’ कोसळले; पायलट सुरक्षित

‘मिग-21’ कोसळले; पायलट सुरक्षित 

पक्ष्याच्या धडकेमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

बिकानेर / वृत्तसंस्था

गेली अनेक वर्षे वायुसेनेत कार्यरत असलेले आणि सतत अपघात होणारे मिग-21 हे लढाऊ विमान शुक्रवारी राजस्थानमधील बिकानेर येथे कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या अपघातादरम्यान वैमानिक सुखरूप बाहेर पडल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे.

राजस्थानच्या बिकानेरमध्ये शोभा सार की धानी भागात शुक्रवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे मिग-21 बायसन विमान कोसळले. सुदैवाने वैमानिक या अपघातातून बचावला. नाल येथून मिग-21 बायसन विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यात येईल असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. पक्ष्याची धडक बसल्यामुळे हे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिग-21 हे विमान भारत-चीन युद्धानंतर 1974 साली भारताच्या वायुसेनेत दाखल झाले होते. तेव्हापासून मिग-21 हे विमान वायुसेनेत कार्यरत आहे. 2006 मध्ये या विमानांमध्ये सुधारणा करून त्यांची क्षमता वाढवण्यात आली. आर-73 क्षेपणास्र बसवल्यानंतर या विमानांच्या हवेतून हवेत मारा करण्याच्या क्षमतेमध्ये मोठी सुधारणा झाली होती. इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत मिगö21 हे विमान सध्या तरी अनेक देशांनी आपल्या वायुदलातून कालबाह्य केले आहे. पण भारताच्या वायुदलात अजूनही मिग-21 या विमानांचा वापर केला जात आहे.

पाकिस्तानकडून एफ-16 या लढाऊ विमानाद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने मिग-21 या विमानाचा वापर केला होता. पण वास्तव पाहता मिग-21 हे विमान एफ 16 या विमानाच्या तोडीचे विमान नाही. तरीदेखील भारताकडून अजूनही मिग 21 विमानाचा वापर केला जात आहे.