|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मताधिक्य साडेतीन लाखांवर नेणार : खा. संजयकाका पाटील

मताधिक्य साडेतीन लाखांवर नेणार : खा. संजयकाका पाटील 

प्रतिनिधी/ सांगली

गेल्या साडेचार वर्षात विकासकामे सांगली लोकसभा मतदारसंघात केली आहे, त्या जोरावरच आपली भाजपाकडून उमेदवारी फिक्स आहे. माझ्याबाबत काही मंडळी संशयास्पद वातावरण निर्माण करत आहेत. त्यांच्याकडे मी लक्ष देणार आहे. पण आता आगामी निवडणुकीत फक्त आणि फक्त माझे स्वतःचे मताधिक्य साडेतीन लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी  पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसापासून माझ्याबाबत काही मंडळी जाणूनबुजून संशयास्पद वातावरण निर्माण करत आहेत. ही मंडळी सोशल मीडियातून सक्रिय झाली आहेत. या मंडळीचा समाचार आपण वेळ आल्यावर निश्चितच घेणार आहे. भाजपाकडून आपण उमेदवारीची दावेदारी केली आहे.  आपण मोठय़ाप्रमाणात विकासकामे केली आहेत त्यामुळे आपल्याला ही उमेदवारी निश्चितच मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे आपण उमेदवारी यापूर्वीच मागितली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात आपण गेल्या साडेचार वर्षापासून विकासकामे करत आहे. पाण्याचा फार मोठा प्रश्न आपण पंतप्रधान सिंचन योजनेतून सोडविला आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू या योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न केला. त्यातून अनेक गावांना पाणी मिळाले आहे. याशिवाय सांगली मतदारसंघातील अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे भाजपाचे तिकिट हे आपणालाच मिळणार आहे.

सांगली मतदारसंघात विरोधक म्हणून लढण्यास अद्यापही कोणी तयार नाही. जनतेचे प्रश्न सातत्याने सोडवत असल्याने आपल्याला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. गेल्या निवडणुकीत आपणाला अडीच लाखाचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य आता साडेतीन लाखांवर नेणे हेच माझे उद्दिष्टय़ आहे आणि त्यानुसार आपण काम करत आहे. माझी राजकीय जडणघडण ही तासगाव-कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात मोठय़ाप्रमाणात झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील अनेक विकाकामे आपण पूर्ण केली आहेत. पण, त्याबरोबरच इतर विधानसभा क्षेत्रातही कामे केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: