|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिकॅलिब्रेशनसाठी आकारणी करणाऱया एजन्सीची पोलखोल

रिकॅलिब्रेशनसाठी आकारणी करणाऱया एजन्सीची पोलखोल 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी स्पीड गर्व्हनर रिकॅलिब्रेशन करणे, हे सक्तीचे नसल्याचे केंद्र शासनाने निर्देशित केले आहे. असे असतानाही  रिकॅलिब्ा्रsशनसाठी बेकायदेशीरपणे आकारणी करणाऱया रत्नागिरीतील केजीएन एजन्सीची ‘आपुलकी’ या सामाजिक संस्थेकडून पोलखोल करण्यात येवून आरटीओने केजीएनवर 30 दिवसांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर रिकॅलिबेशन गरज असल्यास करावयाची असून बेकायदेशीर कोणती एजन्सी असे करत असल्यास त्वरित आरटीओ यांच्याकडे तक्रार द्यावी, असे आवाहन ‘आपुलकी’कडून करण्यात आले आहे.

  रिकॅलिबेशन करणे सक्तीचे नसले तरी केंद्र शासनाने या बाबतच्या वारंवार सूचना कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने काही तक्रारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्या बाबत कोणतीही तक्रार कार्यालयास प्राप्त झाल्यास आपल्या व्यवसाय प्रमाणपत्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे पत्र सर्व स्पीड गर्व्हनर व्यवसाय प्रमाणपत्रधारकांना दिले आहे. असे असताना हे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने आपुलकी सामाजिक संस्थेने एक तक्रार अर्ज केजीएन एजन्सीच्याविरोधात आरटीओ विनोद चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार केजीएन एंटरप्रायझेसवर 30 दिवसाची निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पत्र विनोद चव्हाण यांनी ‘आपुलकी’कडे दिले आहे. याविषयी वाहनधारकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने आपुलकी या संस्थेमार्फत शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौरभ मलुष्टे, जान्हवी पाटील, प्रणव पोळेकर, स्वप्नील पाथरे आदींनी या स्पीड गर्व्हनर रिकॅलिबेशन प्रकरणाविषयी माहिती देत याविषयीचे पुरावे सादर केले.

आवश्यकता नसताना वाहनधारकांना रिकॅलिब्रेशनसाठी 2200 रू. आकारणी केली जात होती. यासंदर्भात केजीएन एंटरप्रायझेसला ‘आपुलकी’चे सौरभ मलुष्टे यांनी विचारणा केली असता या एंटरप्रायझेसने रक्कम आकारणी करण्याचा अधिकार असल्याचे सांगत कॅशमेमो स्वरूपातील पावती दिली आहे. याविषयी ‘आपुलकी’ने आरटीओ विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार कानावर घातला. इतकेच नव्हे तर गेले 2 वर्षे हा प्रकार सुरू असून वाहनधारकांना नाहक भुर्दंड बसत असल्याचे दाखवून दिले. या प्रकरणाची विनोद चव्हाण यांनी गांभिर्याने दखल घेवून त्वरित संबंधित या एजन्सीवर निलंबनाची कारवाई केली.

आरटीओ चव्हाण यांनी असा प्रकार होत असेल तर ही बाब अतिशय चुकीची असून पुन्हा कोणत्याही एजन्सीने रिकॅलिब्रेशनसाठी सक्ती केल्यास त्वरित आपल्याकडे संपर्क साधावा, असे आपुलकी संस्थेचे सौरभ मलुष्टे, जान्हवी पाटील, प्रणव पोळेकर, स्वप्नील पाथरे यांच्याशी चर्चा करताना सांगितले. आता नवीन नियमावलीनुसार दरवर्षी रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक नसून त्यातून आवश्यक वाटल्यास आरटीओ कार्यालयाकडून रिकॅलिब्रेशनसंबंधी सांगितले जाणार आहे. एजन्सीने वाहनधारकांना मात्र सक्ती करायची नाही.

वाहनचालकांना मिळाला दिलासा

आपुलकी संस्थेने स्पीड गर्व्हनर रिकॅलिब्रेशन संबंधित प्रकरणाच्या खोलात जावून वाहनधारकांना वारंवार फटका बसू नये, यासाठी पोलखोल केली. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. तसेच आरटीओ यांनी त्वरीत या प्रकरणाची दखल घेवून कार्यवाही केल्याने आपुलकीने आरटीओ चव्हाण यांचे आभार मानले.