|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरस्वतीचे उपासक बना, सुसंस्कृत समाज घडवा

सरस्वतीचे उपासक बना, सुसंस्कृत समाज घडवा 

सभापती डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

 

प्रतिनिधी/ सांखळी

आपल्या वयाच्या केवळ अठरा वर्षामध्ये संपूर्ण जगाला तत्वज्ञान देणाऱया संत ज्ञानेश्वरांचा विसर कधीही पडू देऊ नका तसेच सरस्वतीचे उपासक बना आणि एक चांगला सुसंस्कृत समाज घडवा, असे आवाहन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बिल्वदल सांखळी आयोजित कोल्हापूरच्या महालक्ष्मी गंथ दालनामध्ये वेदमूर्ती घनःश्यामशास्त्री जावडेकर सभागृह सांखळी येथे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. बिल्वदलच्या सचिव ऍड अरुणा बाक्रे, उपाध्यक्ष म. कृ. पाटील, अध्यक्ष सागर जावडेकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र साखरदांडेकर, ज्येष्ठ सदस्य प्रज्वलिता गाडगीळ तसेच वर्धमान शेंदुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ग्रंथ दालनाचे संयोजक राजू खेडेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अल्पवयात जे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले व महान असे तत्वज्ञान संपूर्ण जगाला बहाल केले अशा महान संतांना प्रथम वंदन करावे व त्यांचा कधीही विसर पडता देऊ नये. ग्रंथ प्रदर्शनातन आपल्याला नेहमीच असंख्य पुस्तकांचा परिचय होत असतो. किमान परिचय करून घेण्यासाठी व गंथदर्शन घेतले तरी आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते, असे सभापती म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक भाषणात बिल्वदलचे अध्यक्ष सागर जावडेकर यांनी पुस्तक म्हणजे मस्तक आहे. या मस्तकात आपल्याला ज्ञान साठवून ठेवायचे आहे. त्यासाठीच ग्रंथांचे वाचन आवश्यक आहे. जीवनात पुढे जायचे असेल तर ज्ञानाने समृद्ध व्हावयाचे असेल तर चांगल्या पुस्तकांचे वाचन आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

17 मार्चपर्यंत ग्रंथ प्रदर्शन खुले

ऍड. करुणा बाक्रे यांनी आभार मानले. विठ्ठलापूर सांखळी येथे हे प्रदर्शन 17 मार्चपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्र्घ 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ते सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे. शैक्षणिक संस्थांसाठी जादा पुस्तक खरेदीवर जास्त सुट देण्यात येईल, असे राजू खेडेकर यांनी सांगितले.