|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आमदार काँग्रेसचा असलो, तरी रक्त ‘स्वाभिमानी’!

आमदार काँग्रेसचा असलो, तरी रक्त ‘स्वाभिमानी’! 

रिफायनरी रद्दचा ‘पडेल कॅन्टिन’वर विजयी मेळावा

प्रधानमंत्री हे देशाचे चौकीदार असतील, तर मी देवगडचा चौकीदार आहे, आमदार नीतेश राणे

 वार्ताहर / देवगड:

तांत्रिक अडचणींमुळे मी आमदार काँग्रेसचा असलो, तरी रक्ताने स्वाभिमानी आहे. रिफायनरी प्रकल्प जरी येथून हद्दपार झाला असला, तरी पर्यटनाला पोषक प्रकल्पातून तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी रिफायनरी प्रकल्पात केलेली दलाली त्यांच्या गळय़ापर्यंत आली आहे. रोजगार विषयाच्या आड राहून दलाली करून कोकणी माणसाला विकण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. प्रधानमंत्री हे देशाचे चौकीदार असतील, तर मी देवगडचा चौकीदार आहे, असे आमदार नीतेश राणे यांनी पडेल कॅन्टिन येथे व्यक्त केले.

नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त व संघर्ष समितीच्यावतीने पडेल कॅन्टिन येथे नुकताच झाला. यावेळी राणे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी, बाळा खडपे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, महिला तालुकाध्यक्षा प्रीती वाडेकर, युवक अध्यक्ष बिर्जे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अविनाश माणगावकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकुर, रामेश्वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, सौ. अनघा राणे, शुभा कदम, रवी पाळेकर, संजय बोंबडी, जनार्दन तेली, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, रामेश्वर सरपंच विनोद सुके आदी उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले, रिफायनरीविरोधीचा संघर्ष दुतोंडी शत्रूविरोधात होता. ज्यांच्या विरोधात लढत होतो, त्यांनी सत्य परिस्थिती जनतेला कधीच सांगितली नाही. हा प्रकल्प झाला असता तर कोकणी माणसाचे आयुष्य उद्धवस्त झाले असते. शिवसेना-भाजप सरकारला रिफायनरी रद्द करायचाच होता, तर पाच वर्ष का लागली? आचारसंहितेच्या दोन दिवस अगोदर प्रकल्प रद्द केला. नाणार प्रकल्प डोक्मयावर लादला व जनतेची पाच वर्षे वाया घालवली, असेही त्यांनी सांगितले.

राणेंच्या कडवट भूमिकेमुळेच प्रकल्प रद्द

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पाच वर्षात कोकणाला काहीही दिलेले नाही. फक्त संघर्ष करायला लावला. लोकसभेत ‘पिझ्झा-बर्गर’ बाबत बोलणारे रिफायनरीबाबत बोलले नाहीत. तर प्रकल्पातील दलालीमुळे जठार हे रिफायनरी जनतेच्या माथी मारण्याचे काम करीत होते. स्वाभिमानचे पक्षाध्यक्ष नारायण राणेंनी प्रकल्पविरोधी कडवट भूमिका घेतली नसती, तर प्रकल्प रद्द झाला नसता, असेही त्यांनी सांगितले.

जनतेसाठी आमदारकी ‘कुर्बान’

रिफायनरीला जनतेचा तीव्र विरोध दाखवायला विधानसभेत राजदंड पळवला. राजदंड पळविल्यानंतर सेनेचे ‘कावळे’ धावत आले. ज्या जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेच्या पायऱया चढलो, त्या जनतेसाठी शंभरवेळा आमदारकी कुर्बान करेन. जनतेला मोकळा श्वास घेता येणार नसेल, तर आमदारकी काय कामाची? असेही राणे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सामंत, डॉ. कुलकर्णी, सुरेश केळकर, संजय बोंबडी यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी आमदार राणेंचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रमोद नलावडे यांनी केले.