|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पुलवामामध्ये दहशतवाद्याचा खात्मा

पुलवामामध्ये दहशतवाद्याचा खात्मा 

काश्मीरमध्ये सैन्य अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ातील त्राल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. सुरक्षा दलांनी त्राल भागातील एका गावाला रविवारी दुपारी घेराव घातला होता. शोधमोहिमेदरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबारास प्रारंभ केला होता.

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. काही दहशतवादी लपले असल्याने गावात जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. चकमकीवेळी सुरक्षा दलांवर फुटिरवाद्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

पुलवामा हल्ल्यात इलेक्ट्रिशियन सामील

पुलवामा हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुद्दसिर अहमद खान याचाही सहभाग होता. इलेक्ट्रिशियन असणाऱया 23 वर्षीय मुद्दसिरने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ल्यासाठी कार तसेच स्फोटके जमविली होती. 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ल्यापूर्वी आदिल अहमद डार हा मुद्दसिरच्या संपर्कात होता. फेब्रुवारी 2018 मध्ये सैन्यतळावर झालेल्या हल्ल्यात देखील मुद्दसिर सामील होता.