|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लोकसभेच्या मैदानात दिलीप पाटील इच्छुक

लोकसभेच्या मैदानात दिलीप पाटील इच्छुक 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली लोकसभा मतदारसंघ हा स्व. वसंतदादा पाटील यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचाच हक्क आहे. पण, अहमदनगर आणि सांगली मतदारसंघाबाबत दोन्ही काँग्रेस पक्षात आदलाबदल झाल्यास ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला सोपी जाणार आहे. त्यामुळे येथून मी स्वत: इच्छुक असल्याचे मत, जिल्हा बँकेचे चेअरमन दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही सांगितले.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पण, कोणत्याच राजकीय पक्षाने सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत घोषणा केली नाही. त्यामुळे मतदार संघात संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच जिल्हा बँकेचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी पक्षाने आपणास उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढविणार असल्याचे सोमवारी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क आहे. पण, नगर आणि सांगली या दोन मतदारसंघाच्या अदलाबदलाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात दिल्लीतील बैठकीवर निर्णय अपेक्षित आहे. मतदारसंघात अदलाबदल झाल्यास राष्ट्रवादीकडून सांगली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहे. ही निवडणूक राष्ट्रवादीला सोपी असून निश्चितपणे विजय खेचून आणू असा विश्वासही दिलीपतात्या पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून गेली चार वर्षे शेतकऱयांचे हित डोळय़ासमोर ठेवून काम करीत आहे. कामाच्या माध्यमातून जिल्हय़ाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहचलो आहे. त्यामुळे आपणास संधी दिल्यास दोन्ही पक्ष एकसंघपणेही काम करतील. शिवाय स्व. राजारामबापू पाटील यांना मानणारा गटही मोठा आहे. यामध्ये जतचे आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार संभाजी पवार, रावसाहेब पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांचे माझ्या उमेदवारीला चांगले पाठबळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related posts: