|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रोजंदारीवरील कामगारांचे पालिकेसमोर धरणे

रोजंदारीवरील कामगारांचे पालिकेसमोर धरणे 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव पालिकेच्या रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीपोटी दुप्पट रक्कम कापून घेण्याचा प्रकार घडलेला असून सदर अतिरिक्त रक्कम परत करण्याच्या बाबतीत होणाऱया विलंबाच्या निषेधार्थ सदर कामगार सोमवारी सायंकाळी मडगाव पालिकेच्या इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली.

शॅडो कौन्सिलने हा विषय लावून धरलेला आहे. मडगाव पालिकेने भविष्य निर्वाह निधीपोटी जमा करायचा आपला हिस्साही या कामगारांच्या वेतनातून कापून घेतला आहे. सरासरी प्रत्येक कामगाराच्या वेतनातून 48 हजार 600 इतकी अतिरिक्त रक्कम बेकायदा कापून घेण्यात आली आहे. एकंदरित ही रक्कम सुमारे 1 कोटी रुपये इतकी होते. गेल्या वर्षी 1 मे रोजी हा प्रकार पालिकेच्या नजरेस आणला होता.

 मात्र चूक न सुधारता अतिरिक्त रक्कम कापून घेणे पालिकेकडून चालूच राहिले. डिसेंबर, 2017 पासून 27 महिने हा अतिरिक्त रक्कम कापून घेण्याचा प्रकार घडलेला आहे, याकडे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी लक्ष वेधले आहे. 20 दिवसांपूर्वी या प्रकाराचा निषेध केल्यानंतर कापून घेतलेली अतिरिक्त रक्कम जमा करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. मात्र अजूनही ती रक्कम कामगारांच्या खात्यात जमा झालेली नाही, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.

दरम्यान निवृत्त झालेले अनुसूचित जमातीतील सात कामगारांना अजूनही भविष्य निर्वाह निधी न मिळाल्याने तेही पालिकेच्या आवारात उपोषणावर बसले आहे. आठवडभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या कामगारांनी आठवडभरात भविष्य निर्वाह निधी दिला न गेल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.