|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

कृष्णेत पातळी घटली : कमी दाबाने पाणी येणार

प्रतिनिधी/ सांगली

 सांगली शहराला पाणीपुरवठा करणाऱया कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून पाणी कमी झाल्याने आगामी काळात महापालिकेकडून कमी दाबाने शहरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे असे आवाहन, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. पाटील यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसापासून कृष्णा नदीपात्रात सातत्याने पाणी कमी होत चालले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणाहून महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा उपसा करण्यात येतो, त्या विहिरीजवळील पाणी पातळी कमी झाली आहे. तसेच ते पाणी अशुध्द आहे. त्यामुळे नागरिकांनी आगामी काळात होणारा पाणीपुरवठा काटकसरीने वापरावा तसेच त्यांनी हे पाणी उकळून प्यावे असेही त्यांनी सांगितले आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. पण, अद्यापही कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवस पाणी पुरवठा हा अपुरा करण्यात येणार आहे. हा अपुरा पाणी पुरवठा होत असताना तो थोडय़ाफार प्रमाणात अशुद्ध असणार आहे. हे पाणी दूषित आढळल्यास ते उकळून प्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

पाणी सोडण्याची विनंती

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडू नये यासाठी कोयना धरणातून विसर्ग करून सांगलीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात सांगली पाटबंधारे मंडळाला महापालिकेकडून विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार आता पाटबंधारे विभागाकडून हे पाणी तातडीने सोडण्यात येणार असल्याचेही मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पी. बी. पाटील यांनी केले आहे.

 

Related posts: