|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शस्त्रदलालाशी राहुल गांधींचं साटंलोटं !

शस्त्रदलालाशी राहुल गांधींचं साटंलोटं ! 

भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा आरोप : रॉबर्ट वड्रांचा मुखवटा म्हणून वापर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून चौकशी होत असलेल्या शस्त्रदलाल संजय भंडारीसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच साटंलोटं असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भावोजी (रॉबर्ट वड्रा) आणि मेहुणेसाहेब (राहुल गांधी) कौटुंबिक भ्रष्टाचारात लिप्त आहेत. संजय भंडारीशी असलेले राहुल यांचे संबंध उघड झाले आहेत. संरक्षण व्यवहारांमध्ये इतका रस का आहे याचे उत्तर राहुल यांनी देशाला द्यावे असे विधान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी केले आहे.

राहुल गांधी आता रॉबर्ट वड्रा यांच्या मागे लपू पाहत आहेत. काही रुपयांसाठी, जमिनीसाठी देशाची सुरक्षा धोक्यात का टाकली याचे उत्तर राहुल यांनीच जनतेला द्यावे. गांधी-वड्रा कुटुंबाने कौटुंबिक भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या तयार केल्याचे समोर आलेल्या पुराव्यातून स्पष्ट होत असल्याचा दावा भाजपने केला आहे.

एच. एल. पाहवा नावाच्या व्यक्तीच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले असता राहुल गांधींसोबतच्या  देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत. जमिनीच्या खरेदीशी संबंधित या दस्तऐवजांमधून पाहवा याच्यासोबत राहुल यांचे आर्थिक संबंध असल्याचे स्पष्ट होते.  राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांच्यासाठी जमीन खरेदीकरता सी.सी. थंपी या व्यक्तीने 50 कोटींपेक्षा अधिक रक्कम उपलब्ध केली होती. थंपीचे नाव दिल्ली-एनसीआरमधील 280 कोटींच्या जमीन खरेदीत समोर आल्याचे इराणी म्हणाल्या.

वड्रा यांच्यासह राहुल गांधी कौंटुबिक भ्रष्टाचारात सामील असल्याचे समजते. थंपी आणि शस्त्रदलाल भंडारीचे संबंध जगजाहीर आहेत. भंडारीच्या विरोधात संरक्षण व्यवहाराबद्दल चौकशी सुरू आहे. राहुल गांधी हे संरक्षण सज्जतेतील महत्त्वाचे अडथळे ठरल्याचा आरोप इराणी यांनी केला आहे.