|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात ‘बाहुली’चे जल्लोषात स्वागत

साताऱयात ‘बाहुली’चे जल्लोषात स्वागत 

प्रतिनिधी /सातारा :

लेक लाडकी अभियान प्रस्तुत, ऍड. वर्षा देशपांडे निर्मित ‘बाहुली’ या चित्रपटाचे सातारकरांनी जल्लोषात स्वागत केले. महिला दिनाच्या निमित्ताने येथील ‘राजलक्ष्मी’ चित्रपटगृहात झालेला प्रीमिअर शो ‘हाउसफुल’ झाला. जाणकारांनी या चित्रपटास पसंतीची दाद दिली आणि त्यातील निर्मितीमूल्यांची प्रशंसा केली.

   कैलास जाधव यांनी या चित्रपटाची पटकथा, संवाद लिहिले असून, दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. या चित्रपटाचे कथानक एकोणीसाव्या शतकात पुण्यात घडलेल्या काही घटनांवर आधारित आहे. महात्मा जोतिराव फुले यांचे निकटवर्ती असणारे निष्णात सर्जन डॉ. विश्राम रामजी घोले यांनी सुधारणावादी विचारांची अंमलबजावणी स्वतःच्या घरापासून सुरू केली होती. त्यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष आणि मोजावी लागलेली किंमत, याचे चित्रण कैलास जाधव यांनी केले आहे. सहदिग्दर्शन दीपेन्ती चिकणे यांचे असून, छायाचित्रणाची जबाबदारी केतन मोहिते यांनी सांभाळली आहे. संकलन मोहसीन भालदार यांनी केले असून, कैलास जाधव, सुजीत गायकवाड, यश भोसरकर, सागर चव्हाण, निशांत सपकाळ यांनी संगीत दिले आहे. पार्श्वगायन रवींद्र जावळीकर आणि भारती प्रताप यांनी केले असून, ध्वनिमुद्रण जतीन केंजळे यांनी केले आहे. निर्मिती सूत्रधार म्हणून ऍड. शैलजा जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. प्रीमिअर शोसाठी सुनील खुटाळे आणि अनिल खुटाळे यांचे सहकार्य लाभले.

   एक तास तीन मिनिटे लांबीच्या या चित्रपटाचे चित्रीकरण आणि तांत्रिक संस्करणाची संपूर्ण प्रक्रिया साताऱयात झाली आहे. राजीव मुळ्ये, तनया भुरके, ऍड. वर्षा देशपांडे, भार्गवी तुपे, प्रसाद देवळेकर, प्रकाश टोपे, श्रीकांत के. टी., कुमार भुरके आदींनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. बहुतांश कलावंत कॅमेऱयासमोर प्रथमच वावरत असूनसुद्धा त्यांनी चित्रपटातील पात्रांना योग्य न्याय दिला, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. शुभारंभावेळी विविध शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी, आशा कार्यकर्त्या आणि महिलावर्गासह सातारच्या कलाक्षेत्राशी संबंधित विविध मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे, मधुकर फल्ले, मकरंद गोसावी आदींनी तसेच विजय मांडके, सलीम आतार यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱयंनी चित्रपटाची निर्मितीमूल्ये, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबीविषयी गौरवोद्गार काढले. विविध व्यासपीठांवरून या चित्रपटाचे प्रदर्शन करून हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा, तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मनोदय ऍड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केला.