|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » माजी सैनिकाच्या कुटुंबाचा घातपात करण्याचा प्रयत्न

माजी सैनिकाच्या कुटुंबाचा घातपात करण्याचा प्रयत्न 

चिपळूण / प्रतिनिधी :

शिरळ-मोरेवाडी येथील माजी सैनिकाच्या घरात घुसून खाद्यपदार्थात विषारी पावडर टाकून कुटुंबाचा घातपात करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. घरातील मंडळी बाहेरगावी असताना हे कृत्य करण्यात आले. तसेच महिनाभरापूर्वी दुर्घटना घडवण्याच्या हेतूने गॅस सुरू ठेवण्याचा प्रयत्नही झाला होता असा आरोप कुटुंबींयांनी केला आहे. याबाबत दीपाली महाडीक यांनी बुधवारी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

महाडिक यांचे सासरे कै. रघुनाथ महाडीक हे माजी सैनिक होते. त्यांचे मूळगाव निरबाडे असून गेल्या काही वर्षापासून हे कुटुंब शिरळ येथे रहाते. तक्रारदार दिपाली महाडिक यांच्या कुटुंबात त्यांच्यासह पती, दोन मुले व सासू यांचा समावेश आहे. 13 फेबुवारी रोजी घरात कोणीही नसताना अज्ञाताने मागील दरवाजा उघडून गॅस सुरू करून ठेवला होता.  दीड तासानंतर घरी आलेल्या महाडिक यांच्या हा प्रकार लाक्षात आला.  चुकून गॅसही सुरू राहिल्याचे समजून त्यावेळी त्यांनी घटनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

त्यानंतर 7 मार्च रोजी हे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले होते. 11 मार्च रोजी रात्री 11 वाजता ते घरी परतले, तेव्हा मागील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकाची तयारी सुरू केली असता प्रत्येक पदार्थ पाण्याच्या सपर्कात येताच त्याला फेस येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अगदी मिठापासून सर्व खाद्यपदार्थाचे डबे उघडून पाहिले असता त्यात कसलीतरी पावडर टाकल्याचे व त्यामुळे या पदार्थांना वास येत असल्याचे लक्षात आले. दोन्हीवेळेचा प्रकार कोणीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने केल्याची महाडिक यांची खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.