|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आधी हित दुध उत्पादकांचे त्यानंतरच डेअरी कामगारांचे

आधी हित दुध उत्पादकांचे त्यानंतरच डेअरी कामगारांचे 

प्रतिनिधी /फोंडा :

गोवा दुध उत्पादक संघ (गोवा डेअरी) कमागार संघटनेची सातवा वेतन आयोगाची मागणी विनाकारण असून जोपर्यंत गोवा डेअरीची आर्थिक परीस्थिती सुधारत नाही तोपर्यंत कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करू नये असे आवाहन डेअरी संलग्न दुध सोसायटीचे अध्यक्षांनी एकसूराने केले.

फोंडा येथे काल गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी विविध दुध सोसायटीचे अध्यक्ष जयंत देसाई, ज्योतिबा घेवडे, विकास प्रभू, रमेश नाईक आदी उपस्थित होते. गोवा डेअरीबद्दल येथील कामगारांना कोणताच पुळका नसून त्यांना फक्त भरघोस पगारवाढ हवी आहे. डेअरीच्या भ्रष्टाचाराबद्दल  कामगार संघटनने कधी भ्र देखील काढलेले नाही. शेतकऱयांनी भर पावसात भ्रष्टाविरोधात पुकारलेल्या ‘गोवा डेअरी बचाव’ आंदोलनालाही कामगार संघटनेने पाठिंबा दिलेला नव्हता तसेच याबद्दल कोणतीच विचारपुससुद्धा केली नव्हती असा आरोप शेतकऱयांनी केला आहे.

रूपये दोन कोटी नफा शेतकऱयांना दुध दरफलक द्यावा

दुध उत्पादकांना मागील दोन वर्षापासून दुध दरफलक मिळालेला नाही.  डेअरीने पशुखाद्यात रू. 2.50 प्रति किलो केलेल्या दरवाढीमुळे सुमारे रूपये दोन कोटी निव्वळ नफा कमावलेला आहे. दुध उत्पादकांचे हित लक्षात घेता डेअरीने शेतकऱयांना रूपये दोन कोटी दुध दरफलक देणे शक्य असल्याचा दावा केला असून तो त्वरीत वितरीत करावा अशी शेतकऱयांच्या हिताची प्रमुख मागणी केली.

सोसायटी जगणे मुष्किल  

दुध सोसायटीची परीस्थीती नाजूक असून डेअरीतर्फे प्रत्येक सोसायटीला देण्यात येणारा कमिशन रू. 18 पैसे पुरत नसून त्याऐवजी रू. 50 पैसे कमिशन प्रति लिटर द्यावा अशी मागणी विकास प्रभू यांनी केली. दुध सोसायटीवर आधुनिक मार्गदर्शन तत्वानुसार पद्धती लादण्यात आल्याने सोसायटीचा खर्च सांभाळणे अवघड होत आहे तसेच ऑडीटर सोसायटी नुकसानीत असल्याचा शेरा मारत असल्यामुळे सदर सोसायटी वाचविण्यासाठी प्रति लिटर कमिशनात 50 पैसे वाढ करावी अशी मागणी केली.