|Thursday, November 21, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषक उंबरठय़ावर, तरी बरेच प्रश्न अनुत्तरित!

विश्वचषक उंबरठय़ावर, तरी बरेच प्रश्न अनुत्तरित! 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमवावी लागली, त्यावेळी आपला ‘प्लॅन ए’ तयार होता. पण, त्यात यश मिळाले नाही तर पर्यायी व्यवस्था म्हणून परिणामकारक ‘प्लॅन बी’ आपण केला नव्हता आणि त्याचा फटका बसला असल्याची कबुली भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिली. पण, इंग्लंडमध्ये होणारी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारतीय संघाला अनेक पर्याय आजमावल्यानंतर देखील काही प्रश्नांची उकल करता आलेली नाही, यामुळे चिंता निर्माण झाली आहे. ऋषभ पंतसारख्या आश्वासक खेळाडूने निराशाजनक प्रदर्शन केल्याने देखील संघव्यवस्थापनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

आगामी विश्वचषक स्पर्धेत चौथ्या स्थानी फलंदाजीला कोण उतरणार, शिखर धवन सातत्याने अपयशी ठरत असेल तर तिसरा सलामीवीर कोण, चौथा स्पेशालिस्ट जलद गोलंदाज कोण, धोनीनंतर दुसरा यष्टीरक्षक कोण व रविंद्र जडेजाचे प्रदर्शन अपेक्षापूर्ती करणारे आहे का, असे अनेक प्रश्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेनंतरही कायम राहिले आहेत. अर्थात, आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार असल्याने स्पर्धेतील 9 पैकी 6 साखळी सामने जिंकले तरी भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, असे चित्र आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनच दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या वनडे मालिकेत भारताला 2-3 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यात कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज अजिबात प्रभावशाली योगदान देऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोहलीने मालिकेत दोन शतकांसह 310 धावा केल्या तर रोहित शर्माने 2 अर्धशतकांसह 202 धावा केल्या. शिखर धवन, केदार जाधव किंवा विजय शंकर यांनी काही लक्षवेधी डाव साकारले. पण, मालिकेत त्यांच्या कामगिरीत सातत्याचा प्रचंड अभाव राहिला.

महेंद्रसिंग धोनी अपेक्षेप्रमाणे यष्टीरक्षणात अव्वल ठरला. पण, शेवटच्या दोन वनडेत त्याच्या गैरहजेरीत ऋषभ पंतने प्रचंड निराशा केली, ते धक्कादायक ठरले. या शेवटच्या दोन वनडेत विराट कोहलीला धोनीसारख्या मार्गदर्शकाची उणीव जाणवली, ते ही महत्त्वाचे होते. गोलंदाजीत कुलदीप यादव (10 बळी) महागडा ठरला तर जसप्रित बुमराहला (7) अपेक्षित यश लाभले नाही.

शेवटच्या वनडेत मात्र त्याने एक षटक वगळता टिच्चून मारा केला होता. फिरकीपटू रविंद्र जडेजाला 4 सामन्यात 3 बळीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे, तो ही उपयुक्तता सिद्ध करण्यात कमालीचा अपयशी ठरला.

केएल राहुलला स्वतःला सिद्ध करण्याची आणखी संधी मिळणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात या मालिकेत त्याला केवळ एकदाच अंतिम संघात स्थान मिळाले. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱया ऋषभ पंतला शेवटच्या वनडेत बढती देण्यात आली. पण, तरीही तो या संधीचा अपेक्षित लाभ घेऊ शकला नाही. केएल राहुलला एका सामन्यात खेळवले, त्यावेळी विराट त्याच्यासाठी तिसऱया स्थानाऐवजी चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरला. पण, राहुल तरीही यशस्वी ठरला नव्हता.

विराटने 15 पैकी एकाच जागेवर कोण, याचा निर्णय होणे बाकी असल्याचे नमूद केले असले तरी ती जागा कोणती, हे मात्र त्याने गुलदस्त्यातच ठेवले आहे. सूत्रांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऋषभ पंत व अनुभवी दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणाला खेळवायचे, याबाबत निश्चितता नाही.

हार्दिक पंडय़ा हा विजय शंकरपेक्षा बराच सरस गोलंदाज आहे, हे स्पष्ट आहे. सिद्धार्थ कौलला पहिल्या दोन सामन्यात स्थान मिळाले. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. अंतिम संघाचे चित्र कसे असेल, हे स्पष्ट होण्यासाठी साधारणपणे दि. 20 एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

Related posts: