|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पवार, विखेंचा निर्णय आणि डळमळीत साम्राज्य!

पवार, विखेंचा निर्णय आणि डळमळीत साम्राज्य! 

पवारांची माढातून माघार आणि विखेंचा भाजप प्रवेश या घटनांनी काँग्रेस आघाडीला निवडणुकीपूर्वी झटका तर बसला आहेच शिवाय सहकारसम्राटांचे साम्राज्य डळमळीत झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुका दारात येऊन ठेपलेल्या असताना अचानक ज्येष्ठ नेते शरद पवार माघारीची आणि मावळमधून नातू पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्याचवेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. ते नगर लोकसभा मतदार संघातून आता कमळाच्या चिन्हावर लढतील. या दोन्ही घटनांनी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पॅनेलला जोराचा झटका बसलेला आहे. आधीच लढण्यास इच्छुक नसलेल्या अनेकांना राजी करण्यात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा वेळ गेला असताना दोन मोठय़ा घराण्यांमुळे नवे वादळ उठले. पवारांच्या न लढण्यामागे कौटुंबिक कलहाचे प्रमुख कारण पुढे आले आहे. अजित पवार यांच्या राजकारण प्रवेशामुळे थोरले पुतणे व आप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांनी क्षेत्र बदलले होते. हीच वेळ आपला मुलगा रोहितवर येऊ नये म्हणून त्यांनी रोहितना आधीच राजकारणात आणले.  रोहित हे विधानसभेस अनुकूल मतदारसंघ शोधत असताना अजितदादांनी मावळमधून पार्थ यांच्यासाठी रणनीती आखली. त्यात एका घरातून किती उमेदवार देणार असा प्रश्न करून थोरल्या पवारांनी पार्थ यांच्या उमेदवारीची शक्यता फेटाळली. अन् थेट माढातले वातावरण बदलले. पंतप्रधान होण्यासाठी पवार लढत असताना त्यांच्यासमोरच गोंधळ झाला. समाज माध्यमात ‘माढा : बारामतीकरांना पाडा’ असे संदेश फिरले. मोहिते-पाटलांच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता व्यक्त झाली. अखेर पवारांनी न लढण्याचा निर्णय घेत पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. आता पार्थ यांचा दौरा सुरू झाला आणि नवी आव्हाने त्यांना आणि अजितदादांनाही दिसू लागली आहेत. त्याचवेळी रोहित पवार यांनी आजोबांना निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. (पण राज्यातील पक्षाचे सर्व नेते आश्चर्यकारकरित्या गप्प आहेत.) तर आपण पवारांना निर्णयावर फेरविचाराचे आवाहन करणार नाही. ते उत्तुंग नेते आहेत आणि आयुष्यात कधी त्यांच्या निर्णयावर आपण भाष्य केलेले नाही अशी आठवण अजितदादांनी पत्रकारांना करून दिली आहे. याचे फटके आघाडीला बसण्याची चिन्हे आहेत.

तीन वेळा पराभवानंतरही राष्ट्रवादी नगर लोकसभा मतदार संघ सोडत नसल्याने  सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसवर दबाव वाढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. आधी ही भेट मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी होती असा खुलासा राधाकृष्ण विखे यांनी केला. पण, सुजय यांनी आपण भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. पाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनी मुलगा ऐकत नसल्याचे आणि पवारांच्या वक्तव्यामुळे आपण त्यांच्या विरोधात प्रचाराला उतरणार नसल्याचे जाहीर केले. त्यांचा राजीनामा घेण्याचा आपणास अधिकार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगून टाकले आहे. हे कमी म्हणून की काय, माजी खासदार रणजितसिंह मोहितेöपाटील यांनीही भाजपशी चर्चा चालवली आणि खुलासाही केला! सातारा जिल्हय़ातील नेते काँग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदनराव भोसलेंनीही भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यातील सहकार सम्राटांची अवस्था काय आहे असा प्रश्न जर कोणी केला तर कधीकाळचे हे ढाणे वाघ सध्या इतके अस्वस्थ झाले आहेत की, त्यांना स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावरही विश्वास राहिलेला नाही. सहकारातून पैसा. पैशातून सत्ता पुन्हा दोन्हीतून पैसा आणि त्यातून पुन्हा सत्ता ही सहकारसम्राटांची यशस्वी पद्धत किंवा मोडस. याच मार्गाने तीन, चार पिढय़ा राज्याचा गाडा हाकला. पण, केंद्रात आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर हे सहकारसम्राट अक्षरशः घाईला आले. त्यात बदलत्या काळात सरकारातून हात मिळणे कठीण झाले. भाजप सरकारने हातचा दिला तरी अटी, शर्तींनी घाईला आणले. त्यामुळेच ज्या सहकाराच्या जोरावर काँग्रेस, राष्ट्रवादीने इतकी वर्षे सत्ता आपल्याकडे राखली तो महाराष्ट्र काँग्रेस इतर राज्यात मजबूत होताना हातातून सुटतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांनीही दोन्ही काँग्रेसला अल्टिमेटम दिले. माकपने दिंडोरी मतदार संघ सोडला नाही तर सोलापूर, पालघरमध्ये उमेदवार उभा करण्याची धमकी दिली आहे. त्यातच सहकारातील केवळ काँग्रेस राष्ट्रवादीच्याच नव्हे तर डाव्या विचारांच्या नातवांनाही भाजपने खुणावले आहे. प्रवरच्या विठ्ठलराव विखेंचा पणतू त्यांनी भाजपमध्ये आणला, अकलूजच्या शंकरराव मोहिते-पाटलांच्या नातवाने चर्चा चालवली आहे तर वाळव्याच्या नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून मंत्री चंद्रकांतदादांनी भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. गौरव यांच्या मातोश्री आधीच जिल्हा परिषदेला भाजप सत्तेत सभापती आहेत. सरकार गेले आणि सहकार डळमळीत झाल्यानंतरची ही अवस्था आहे. दुसरीकडे सांगलीसारखा काँग्रेसचा गतवेळी एकदाच ढासळलेला बालेकिल्ला स्वाभिमानीला देऊ केला तर काँग्रेस कचेरीला टाळे ठोकू असा इशारा निष्ठेसाठी प्रसिद्ध वसंतदादा आणि गुलाबराव पाटील यांच्या वारसांनी काँगेसला दिला आहे. जनतेत सत्ताविरोधी संताप असताना गर्भगळीत झालेल्या आघाडीचे हे चिन्ह!

हट्टाला पेटलेले सुधारले!

शिवसेना, भाजपची युती झाल्यानंतर गोडीचे वातावरण आहे. ठाकरे विखेपुत्राचा लाड करण्यास तयार आहेत तर मुख्यमंत्री नाराज सैनिकांना महामंडळे आणि राज्यमंत्र्यांना प्रमोशनच्या विचारात आहेत. एका दिवसात 164 शासन निर्णय घेतले. हा समंजसपणा सत्तेच्या प्रारंभीच्या वर्षात दाखवला असता तर काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा चांगला कारभार अनुभवला असता. आता सहा महिन्यात स्थिती किती सुधारणार? हट्टाला पेटलेले सुधारले आणि राष्ट्रवादीने पाडले तसे सेनेने भाजपचे राज्यातील सरकार पाडले नाही फक्त इतका सूक्ष्म फरकच दोन सत्तांमध्ये आतापर्यंत अनुभवायला आला आहे. बाकी सारे तेच!

शिवराज काटकर