|Sunday, August 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पबजीच्या पाशात!

पबजीच्या पाशात! 

पबजी खेळण्याचा अतिरेक झाला आणि पैलवान वेडा झाला, पबजी खेळण्याच्या नादात व्यायाम शाळेतील इन्स्ट्रक्टरचे मानसिक संतुलन बिघडले, मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात पाणी समजून ऍसिड प्याला, बापाच्या इ वॉलेटमधून 50 हजाराची विल्हेवाट मुलाने ऑनलाईन गेम खरेदी करून लावली… या आणि अशाच प्रकारच्या असंख्य बातम्यांनी सध्या वृत्तपत्रांचे रकाने पालकांना खुणावत आहेत. दारात उभ्या असणाऱया संकटाची या बातम्या फक्त चाहूलच देत आहेत असे नव्हे तर त्याच्यातील गांभिर्यही अधोरेखित करत आहेत. हे असे घडतेच कसे? गेम खेळून माणूस वेडा कसा काय होऊ शकतो? ऍसिड कसे पिऊ शकतो या आणि अशा अनेक शंका लोक घेत आहेत. मात्र दुर्दैवाने या सर्व बातम्या सत्य आहेत, आपल्याच देशात आणि आसपासच्या प्रदेशात त्या घडलेल्या आहेत. आपल्या शेजार, पाजारीही हे घडत आहे किंवा अगदी आपल्या आसपासचा कोणी या दिशेने वाटचाल करत असेल. पण, आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. या पाशात स्त्री, पुरुष, वृद्ध, मुले अगदी कोणीही अडकू शकतो. माणूस एकच गोष्ट सातत्याने आणि झोकून देऊन करू लागला तर तो त्या कामात वेडा झाला आहे असे आपण सहजच म्हणतो. पण, हे वेडे होणे म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचे भान हरपून एखाद्या उच्च ध्येयाच्या मागे झपाटल्यासारखे धावणे असेल तर एकवेळ समजू शकते. त्या ध्येयाच्या पूर्ततेनंतर किंवा त्यासाठीच्या कृतीतून तो घडत असतो. पण, निरर्थक गोष्टीत एखादा व्यक्ती अडकत चालली तर तो त्यातून सुटणे मुश्किल. त्यातून एखाद्याची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यताच अधिक असते. पबजी किंवा त्यासारख्याच विविध गेम्स ज्या मुलांच्या किंवा मोठय़ांच्या हातात मोबाईल, कॉम्प्युटर किंवा अन्य कोणत्याही साधनाच्या रूपाने आलेल्या आहेत त्यातून हाच मोठा धोका संभवतो आहे. त्याबाबतीत पालकांची, विद्यार्थ्यांची, युवकांची जागृती गरजेची आहे. हा फक्त एकटय़ा पबजी नावाच्या गेमचा पाश नाही तर त्याच्याचसारख्या असंख्य गेम आहेत, ज्या माणसाला खुनशी बनवत आहेत. आज्ञेचे पालन करायला सांगून अनेक अनैतिक गोष्टींचे समर्थन किंवा आभासी पद्धतीने तरी त्या करायला भाग पाडल्या जात आहेत. जसे की, पोलिसावरील एका गेममध्ये एक गाडी चालक वेगवेगळे टार्गेट पूर्ण करतो आहे. त्यासाठी तो बंदूक चालवतो, बॉम्बचा वापर करतो, गाडय़ा चोरतो, धडकावतो, लोकांना गाडीतून हाकलून स्वतः त्या गाडय़ांचा ताबा घेतो असे एक ना अनेक प्रकार या आभासी खेळांमधून मुलांना शिकवले जात आहेत. अर्थातच या गोष्टींमध्ये फारसे काही चुकीचे नसते आणि आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी अशा गोष्टी क्षम्य आहेत असे मुलांच्या मनाने नकळत्या वयातच जर पक्के ठरवले तर काय होईल? त्याची वाटचाल समाजात एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून होईल की गुन्हेगार म्हणून, याचा विचार मुलांच्या हातात मोबाईल देताना व्हायला हवा. आभासी जगातील सर्वच गेम या काही मुलांना हिंसक किंवा वाईट कृती शिकवतात असे नव्हे. पण, जे सध्या सर्वात लोकप्रिय गेम्स आहेत त्यामध्ये फक्त हिंसाच भरलेली आहे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन राहिलेले नाही. अमेरिकेतील एका शाळेत एका मुलाने बंदूक आणून 40 हून अधिक मुलांना ठार मारल्याची घटना फार जुनी नाही. कुटुंबापासून तुटलेली, अनेक प्रकारचे राग मनात धुमसत असलेली मुले आपला सगळा राग मोबाईल गेमवर काढतात. त्यातूनही समाधान न झालेली मुले असे कृत्य करतात, असा एक विचार त्यावेळी मांडला गेला. आपल्या मुलांना समजून घ्या, त्यांच्यातील हिंसक वृत्तीला कमी करा, त्याला जास्तीत जास्त समाजस्नेही बनवा असे अनेक उपाय जगभरातील बाल मानसशास्त्रज्ञांनी त्यावेळी व्यक्त केले होते. आता अमेरिकेतील हेच फॅड अगदी ग्रामीण महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात, बिहारमधल्या एखाद्या खेडय़ातही आले आहे. इंटरनेट पोचले आहे तिथपर्यंत सगळीकडेच ते पसरलेले आहे. अर्थातच स्वस्तातील डाटा त्याला अधिकचे बळ पुरवत चालला आहे. त्याच्यावरही कोणाचे नियंत्रण नाही. घरापासून, घरातल्या माणसांपासून तुटलेली मुले आणि माणसे या गेमच्या नादाला लागलेली आहेत किंवा या गेमच्या नादानेही ती या सर्वांपासून तुटलेली आहेत. वयात येणारी मुले तर यात मोठय़ा प्रमाणात अडकत चालली आहेत. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आता शाळा आणि पालकांनीच नव्हे तर समाजातील विविध घटकांनी काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आता उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा लवकरच सुरू होतील. अगदी बालवाडीपासून कॉलेजपर्यंतची मुले व्यक्तिमत्त्व विकास शिबिर नावाने चालवल्या जाणाऱया आगळय़ा वेगळय़ा प्रकारांमध्ये गुंतवली जातील. त्या मुलांचा मामाचा गाव हरवला आहे, रानावनातल्या हुदुडय़ा, निसर्गाशी संवाद, तापल्या उन्हात करपूनही उभे राहण्याची जिद्द, उमेद, मैलो न् मैल भटकून काही शोधण्याची त्यांची जन्मजात वृत्ती कुठेतरी मारून टाकली जात आहे. अशाने मुलांचे व्यक्तिमत्त्व खरेच घडते का, मुलांना ते अपेक्षित असते का याचा विचारही व्हायला हवा. याशिवाय वेशेषतः पाचवीच्या पुढच्या आणि वयात येणाऱया मुलांच्यासाठी विविध शहरांमध्ये मानसिक आरोग्याची शिबिरे घेतली जातात, आपल्या मुलाला तिथपर्यंत घेऊन जाण्याची तसदी आता पालकांनीही घेण्याची खरोखरच वेळ आलेली आहे. मोबाईल गेममधील परिस्थिती आपण नियंत्रित करू शकतो असा या मुलांना लहानपणापासून विश्वास निर्माण होतो. पण, तेच नियंत्रण ते व्यवहारी जगात ठेवू शकत नाहीत तेव्हा एकप्रकारचे नैराश्य त्यांच्या मनाला व्यापू लागते. या निराशेच्या स्थितीतून वास्तव जगात, सर्वच अपेक्षा आणि उद्दीष्टे पूर्ण होत नाहीत, तेव्हा विधायक मार्गाने जाण्यास, शोधण्यास या मुलांना उद्युक्त करण्याची गरज आहे. अन्यथा केवळ गेमच्या माथी मारून हा प्रश्न संपणार नाही. त्याचे मूळ कुठेतरी आपल्या जवळच आहे आणि त्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच पाश नेमका कशाचा आहे ते ओळखले पाहिजे.