|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘ऍरोज डायनॅमिक’च्या गुंतवणूकदारांना दिलासा

‘ऍरोज डायनॅमिक’च्या गुंतवणूकदारांना दिलासा 

मुख्य सूत्रधार अर्जुन सावंत याला जामिनासाठी रोख 10 लाख न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश

  • मुंबई येथील फ्लॅट विक्रीतून येणारी जादाची रक्कम न्यायालयात जमा करावी
  • लिलाव करणाऱया बँकेलाही जादाची रक्कम न्यायालयात भरण्याचे आदेश

प्रतिनिधी / ओरोस:

‘ऍरोज डायनॅमिक’ या वित्तीय संस्थेत गुंतवणूक केल्याने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुख्य सूत्रधार अर्जुन सावंत याला त्याचा मुंबई येथील फ्लॅट विकल्यानंतर वा लिलावानंतर डीएचएफएल या बँकेचे कर्जाऊ घेतलेले पैसे परत करून उर्वरित रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीएचएफएल बँकेलाही उर्वरित रक्कम ओरोस न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जामिनावर बाहेर जाण्यापूर्वी 10 लाख रुपये रोख रक्कम न्यायालयाकडे डिपॉझिट म्हणून जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांच्या हितासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात आला असून सहा महिन्यात त्याने हा व्यवहार पूर्ण न केल्यास त्याचा जामीन रद्द केला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वप्निल सावंत यांनी दिली.

मूळचा वेंगुर्ले येथील व सध्या भांडूप (मुंबई) येथे राहत असलेल्या अर्जुन सावंत याने ‘ऍरोज डायनामिक एन्टरप्रायजेस भांडूप’ नावाची वित्तीय कंपनी सुरू केली होती. महिना तीन ते चार टक्के जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यात आले होते. ते परत करण्याबाबतचे करारपत्र करून ऍडव्हान्स रकमेचे चेकही काहींना देण्यात आले होते.

नेरुरमधील ग्रामस्थाची तक्रार

4 एप्रिल 2013 ते 10 जानेवारी 2015 या कालावधीत झालेल्या या व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार नेरुर कलमेवाडी येथील कृष्णा मदने यांनी 17 ऑक्टोबर 2018 रोजी वेंगुर्ले पोलिसात दिली होती. 2 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांनी प्रोप्रायटर अर्जुन सावंत. पत्नी वैदही सावंत व साथीदार शिवदत्त सावंत या तीनही संशयितांवर भादंवि कलम 406, 420, 34 तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) 1999 चे कलम 3, 4, (1) नुसार गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने तक्रार दाखल झाल्याच्या दिनांकापासून अवघ्या तीन दिवसात संशयितांना अटक करण्यात यश मिळविले होते.

14 गुंतवणूकदारांची फसवणूक

एकूण 14 गुंतवणूकदारांची 89 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे न्यायालयीन चौकशीत समोर आले आहे. तसेच या रकमेतून संशयित आरोपींनी मुंबई येथे फ्लॅट खरेदी केला. त्यानंतर तो डीएचएफएल बँकेकडे गहाण ठेवला व बँकेकडून 1 कोटी 34 लाख 69 हजार रुपये घेतले. त्यातील 50 लाख रुपये आपसात काढून घेतले. त्याचा हिशेब नाही. कर्जाऊ रकमेचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे बँकेने लिलावाची नोटीस बजावली आहे. तर 2 जानेवारी 2019 रोजी मुंबई कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात त्याच्यावर 3 कोटी 2 लाख 50 हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हाही नव्याने दाखल झाला असल्याची बाबही न्यायालयासमोर आली आहे. पुणे येथील चतुश्रुंगी पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा फसवणूक प्रकरणातील गुन्हा नोंद असल्याची माहितीही समोर आली आहे..

दरम्यान या प्रकरणातील वैदही सावंत आणि शिवदत्त सावंत या संशयितांना यापूर्वीच जामीन मंजूर झाले आहेत. तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्जून याने ओरोस येथील विशेष न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता.

विविध ठिकाणी गुन्हे दाखल

विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात झालेल्या या वरील सुनावणीत संशयित आरोपीवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने त्याला लोकांकडून मोठय़ा रकमा स्वीकारून त्या स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्याची सवय असून तो सराईत असल्याची बाब सरकार पक्षाकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र भांडूप येथील त्या फ्लॅटची खुल्या बाजारातील विक्रीची किंमत जास्त असून लिलावात बँकेकडून बँकेची रक्कम वसूल होण्याइतपत लिलाव होण्याची शक्यता आहे. तर खासगी खरेदीदार शोधून विक्री केल्यास जादाची किंमत मिळण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी आरोपीला जामीन मिळावा, अशी मागणी आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली होती.

50 हजाराचा सशर्त जामीन मंजूर

खासगी खरेदीदाराला विकल्यास त्या फ्लॅटची किंमत 2 कोटी 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आल्याने ठेवीदारांच्या हिताचा विचार करून विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी त्याला 50 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये जामिनावर बाहेर जाण्यापूर्वी न्यायालयाकडे 10 लाख रुपये रोख जमा करावेत. तसेच फ्लॅट विक्रीनंतर बँकेचे पैसे भरून उर्वरित जादाची रक्कमम न्यायालयात जमा करावी. याबाबतचे हमीपत्र सादर करण्यात यावे. जामिनावर सुटल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा जामीन रद्द करण्याची मागणी करण्याची मुभा सरकारी पक्षाला देण्यात आली आहे.

दरम्यान जामिनावर बाहेर जाण्यासाठी आरोपीकडून 10 लाख रुपये जमा करून घेतले जाणार आहेत. तसेच फ्लॅटची जादाची सुमारे 56 लाखाची रवकम मिळाल्यास डिपॉझिट व या रकमेतून  ठेवीदारांचे पैसे देणे शक्य होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठेवीदारांना दिलासा दिला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले.

संशयित कांजुरमार्ग पोलिसांच्या ताब्यात

सद्यस्थितीत आरोपी कांजुरमार्ग पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्या ठिकाणची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जामिनावर बाहेर येणार आहे. मात्र फ्लॅट विक्रीत त्याचे नुकसान होऊ नये. जादाची रक्कम मिळाल्यास ठेवीदारांची रक्कम परत करणे शक्य असल्याचा विचार करून संबंधिताला ठेवीदारांच्या हितासाठी जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे ऍड. सावंत यांनी सांगितले. तसेच बँकेने      लिलाव प्रक्रिया केल्यास त्यांच्या वसूल पात्र रकमेपेक्षा जादाची येणारी रककम न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश बँकेला देण्यात आले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.