|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गावकर कुटुंबाच्या मागे अपघाती मृत्यूचे दुष्टचक्र

गावकर कुटुंबाच्या मागे अपघाती मृत्यूचे दुष्टचक्र 

तीन भावंडांचा अपघातीच मृत्यू : पादचारी पूल दुर्घटनेतील मृत भक्ती गावकर मिठमुंबरीच्या

संदीप बोडवे / देवबाग:

गुरुवारी झालेल्या मुंबईतील सीएसएमटी येथील हिमालया पादचारी पूल दुर्घटनेत मिठमुंबरी (ता. देवगड) येथील मूळ रहिवासी असलेल्या भक्ती राजेंद्र शिंदे-गावकर (पूर्वाश्रमीची भक्ती संभाजी गावकर, 40) यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या सीएसटीजवळील शासकीय रुग्णालयात परिचारिका होत्या. काम आटोपून घरी डोंबिवली येथे जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. गावकर यांच्या कुटुंबातील भक्ती यांच्यासह तिन्ही भावंडांचा अपघातीच मृत्यू झाला आहे. या अगोदर त्यांच्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानिमित्त गावकर कुटुंबियांवर अपघाती मृत्यूच्या दुष्टचक्राची चर्चा गावात सुरू आहे. भक्ती यांच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.

भक्ती यांचा मोठा भाऊ किशोर याचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. वडील संभाजी गावकर हे त्याकाळी हिंदळे येथे पोस्टमन म्हणून कामाला होते. आई शिक्षिका होती. कामाच्या निमित्ताने ते तेव्हा हिंदळेत वास्तव्यास होते. किशोर हा मिठबाव येथून कॉलेज आटोपून सायंकाळी हिंदळे येथे जाण्यासाठी निघाला होता. त्याकाळी मिठबाव नदी बोटीने पार करून जावे लागायचे. परंतु होडीला उशीर असल्याने किशोरने नदी पोहत पार करण्याचे ठरविले आणि दुर्दैवाच्या फेऱयाला सुरुवात झाली. नदी पोहत अंतर पार करीत असतानाच नदीच्या प्रवाहात सापडून किशोरचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी तो 22 वर्षांचा होता.

दुसऱया भावाचाही बुडून मृत्यू

दुसरा बंधू अशोक उर्फ भाऊ गावकर यांचा मिठमुंबरी येथे समुद्रात मासे पागत असताना बुडून मृत्यू झाला होता. ही घटना 2016 च्या चतुर्थीत घडली होती. मुंबईत चाकरमानी असलेल्या भाऊ यांना गावी येऊन समुद्रात शेंडीने पागून मासेमारी करण्याचा छंद होता. भाऊ गावकर कुटुंबियांसमवेत दरवर्षी गणपतीला गावी यायचे. पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर रात्री भाऊ शेंडी घेऊन समुद्रात पागायला गेले असता, अचानक खोल समुद्रात ओढले जाऊ लागले. त्यांनी पोहण्याचे शर्थीचे प्रयत्न करूनही नियतीपुढे त्यांचे काही चालले नाही आणि बघता-बघता ते समुद्रात नाहीसे झाले. कुटुंबातील दुसऱया भावावरही काळाने घाला घातला. दुसऱया दिवशी त्यांचा मृतदेह किनाऱयावर नागरिकांना सापडला. भाऊ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

पूल दुर्घटनेत भक्ती यांचा मृत्यू

डोंबिवली येथे राहणाऱया भक्ती शिंदे-गावकर यांच्या रुपाने गुरुवारी तिसऱया भावंडाचेही अपघाती निधन झाले. एकाच घरातील तीन भावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने मिठमुंबरी ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. गावकर कुटुंबियांचे मिठमुंबरी येथे राहते घर आहे. चतुर्थी आणि मे महिन्यात सुट्टीत हे घर गजबजलेले असायचे. घरातील गणपती व पारंपरिक धार्मिक कार्य आई-वडिलांच्या पश्चात अशोक पाहायचे. त्यांच्या मृत्यूनंतर ही सर्व जबाबदारी भक्ती यांच्यावर आली होती. आता हे घर पुन्हा सुने-सुने झाले आहे. मुंबई येथे हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीत वरिष्ठ पदावर असलेले आत्माराम उर्फ बाळा गावकर यांनी गावकर कुटुंबियांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, गावी गेल्यावर या कुटुंबासोबत वेळ कसा जायचा हेच समजत नसे. गावात आल्यावर या कुटुंबाने दाखविलेल्या आपुलकीमुळे आम्हाला मनमुराद आनंद मिळत असे. आता या सुखाला मुकलो आहोत.

Related posts: