|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नांदोस येथे गवारेडय़ाच्या हल्ल्यात शेतकऱयाचा मृत्यू

नांदोस येथे गवारेडय़ाच्या हल्ल्यात शेतकऱयाचा मृत्यू 

वार्ताहर / कट्टा:

  नांदोस-गावकरवाडा येथील शेतकरी सूर्यकांत उर्फ राजा अनंत कोरगावकर (52) यांचा गवारेडय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहेत.

   कोरगावकर हे शेतीतूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरगावकर हे शुक्रवारी दुपारी आपल्या जमिनीतील काजूच्या रोपांना डोंगराळ भागातील शेततळीतील पाणी घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्यावर गवारेडय़ाने हल्ला चढविला. त्यात ते गंभीरपणे जखमी झाले. त्याच जखमी अवस्थेत ते घराजवळ आले व घरातील मुलाला व पत्नीला हाक मारली व ओरडून सांगितले. त्यावेळी पत्नीने व मुलाने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पेंडुर येथे नेले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले. यावेळी वनक्षेत्रपाल पी. जी. कोकितकर, रामचंद्र मडवळ, वनरक्षक धामापूर सारीक फकीर, जयश्री शेलार यांनी पंचनामा केला. याची खबर पोलीस पाटील काळसेकर यांनी पोलिसात दिली. अधिक तपास पीएसआय सवंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टा पोलीस आर. व्ही. मुंडे, एन. आर. शेडगे करीत आहेत.