|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवसेना-भाजपचा लवकरच संयुक्त मेळावा

शिवसेना-भाजपचा लवकरच संयुक्त मेळावा 

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती : जिल्हय़ात उद्योग आले नाहीत, हे सेनेचे अपयश नव्हे!

वार्ताहर / कणकवली:

शिवसेना विकासाच्या विरोधात नाही. मात्र, नाणार येथे प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर दुसऱया कुठल्या भागात या प्रकल्पाचे स्वागत केले गेले, तर तेथे आम्ही विकासाला आडवे जाणार नाही. स्थानिक ग्रामस्थांचे मत महत्वाचे आहे. येत्या आठवडय़ात शिवसेना-भाजपचा सिंधुदुर्गात एकत्रित मेळावा घेण्यात येणार आहे. गेल्या साडेचार वर्षांत सिंधुदुर्गात उद्योग आणता आले नाहीत, हे शिवसेनेचे अपयश मुळीच नाही, असे स्पष्ट करीत गेल्या 25 वर्षांत झाले नाहीत, एवढे प्रयत्न आम्ही रोजगार आणण्यासाठी केले, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कुणाचे नाव न घेता येथे लगावला.

येथील ‘विजय भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, ऍड. हर्षद गावडे, सचिन सावंत, राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

राजापूर भागात नाणार प्रकल्प समर्थकांकडून प्रकल्प होण्यासाठी तेथील जमिनीच्या मालकांकडून संमत्ती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार का? या प्रश्नावर देसाई म्हणाले, नाणार प्रकल्प रद्द करण्याचा आम्ही तेथील जनतेला ठाम शब्द दिला आहे. शिवसेनेचे खायचे वेगळे व दाखवायचे वेगळे दात नाहीत. त्यामुळे नाणार येथे रिफायनरी प्रकल्प येऊ शकत नाही.

रवींद्र चव्हाणांसोबत माझी रोज चर्चा!

देसाई म्हणाले, दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज असल्यानेच युती झाली आहे. शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून लोकसभेतील उमेदवाराचा विजय भक्कम करायचा आहे. युतीच्या जाहीर प्रचारसभांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे. कोकण विभागाची सभा नवी मुंबई येथे होणार आहे. जिल्हय़ातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. याबाबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आपली रोजच चर्चा होत असते.

युतीची दोन दिवसांत बैठक!

शिवसेना-भाजप नेत्यांची दोन दिवसांत मुंबईत बैठक होणार असून त्यानंतर राज्यात आम्ही युतीचे संयुक्त मेळावे घेणार आहोत. युतीने प्रचारात आघाडी घेतल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची पळापळ झाली आहे. लोकसभेसाठी 23 : 25 नुसार जागा वाटप झाले आहे. काँग्रेस आघाडी अजून लटपटतेच आहे. आरपीआय जिल्हाध्यक्षांनी आपला युतीला पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे, यावर लवकरच युतीच्या गाडय़ांवर आरपीआयचा झेंडा दिसेल, असे देसाई यांनी सांगून कोकणातील तरुणांना रोजगार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोकणात पर्यावरण पूरक उद्योग यायला हवेत, असे देसाई म्हणाले.

मुंबईतील दुर्घटनेची चौकशी!

देसाई म्हणाले, मुंबईत गुरुवारी घडलेली पूल दुर्घटना दुर्दैवी आहे. मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात दुरुस्त्या सुचविलेल्या पुलांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यासाठी शासन व महानगरपालिका सक्षम आहे. असे असूनही दुर्घटना घडल्याने सखोल चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यात जे दोषी असतील, त्या कुणालाही क्षमा केली जाणार नाही. राज्याच्या मुख्य सचिवांसोबत आपले बोलणे झाले असून पुलांची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्गातील विमानतळ सुरू झालाय!

गेल्या साडेचार वर्षांत तुम्ही उद्योगमंत्री असताना सिंधुदुर्गात रोजगार निर्मितीचे प्रकल्प का येऊ शकले नाहीत, यावर देसाई म्हणाले, हे आमचे अपयश मुळीच नाही. आडाळीत आता नवीन एमआयडीसी विकसित करीत आहोत. पालकमंत्री दीपक केसरकर हे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या कामांचे टेंडर निघाले आहे. याबाबत गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱयांसोबत आम्ही बैठक घेतली. आडाळीत एमआयडीसी यशस्वीपणे सुरू होईल. सिंधुदुर्गातील विमानतळही सुरू झाल्याचा दावा देसाई यांनी करीत आनंदवाडी बंदरही लवकरच सुरू होईल, असे सांगितले.