|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पंधरा वर्षांनी सुरेश साळोखे स्वगृही !

पंधरा वर्षांनी सुरेश साळोखे स्वगृही ! 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत दाखल

प्रतिनिधी/ कोल्हापूर

नव्वदच्या दशकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद आणि त्यानंतर दोनवेळा आमदारकी भूषविणारे सुरेश साळोखे हे बुधवारी स्वगृही परतले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री या शिवसेनेच्या पॉवर हाऊसमध्ये साळोखे आपल्या समर्थकांसह पक्षात दाखल झाले. साळोखे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी बळ देणारा ठरणार आहे.

1986 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हय़ात शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना स्थापनेत सुरेश साळोखे यांचा मोलाचा वाटा होता. ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी साळोखे यांनी रामभाऊ चव्हाण, शिवाजीराव चव्हाण यांच्या बरोबरीने परिश्रम घेतले होते.  शिवसेनेच्या या वाटचालीत त्यांनी जिल्हाप्रमुखपद आणि 1995 ते 1999 आणि 1999 ते 2004 या काळात दोनवेळा आमदारकी भूषविली. 2004 मध्ये ते मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर साळोखेही शिवसेनेपासून दूर गेले होते. गेली दहा वर्षे ते राजकीय विजनवासात होते. 2014 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकीटावर कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढविली होती. साळोखे आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेत पुन्हा प्रवेशकर्ते झाले आहेत. बुधवारी त्यांनी  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनचा भगवा हाती घेतला. यावेळी जिल्हा प्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, युवा सेना संघटक अवधून साळोखे, आप्पा पुणेकर, रवि साळोखे, प्रा. सुनील शिंत्रे, उमेश काशिद, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.